बुलढाणा, 17 मार्च ( गुड इव्हिनिंग सिटी) : गुडी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर एडेड हायस्कूलच्या मैदानावर चैत्र पाडवा पहाटचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या चार वर्षांपासून बुलढाणा शहारात चैत्र पाडवा पहाट तुषार काचकुरे व श्रीपाद बाबरेकर यांच्या संकल्पनेतून समोर आली आहे. बुलढाणेकरांची मराठी नववर्षाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात मराठी सुमधुर गीतांच्या बहारदार कार्यक्रमातून होणार आहे. चैत्र पाडवा पहाट प्रभाती सूर नभी रंगती… हा कार्यक्रम एडेड हायस्कूल, बुलढाणा येथे गुरुवार, 19 मार्च रोजी पहाटे 5.30 वाजता आयोजित करण्यात आला आहे.
या चैत्र पाडवा पहाटेची सुरूवात संगीत विशारद डॉ.सुरेंद्र शेजे, डॉ.शिल्पा पाटील पवित्रकार यांच्या गीतांनी होणार आहे. त्यांना साथ संगत मिळणार आहे ती कीबोर्ड वादक रामेश्वर काळे, तबला वादक विशाल पांडे, ऑक्टोपड वादक विरू गावंडे यांची तर या कार्यक्रमाचे निवेदक सुनिल ठाकरे हे असणार आहे. हा कार्यक्रम वेळेवर सुरू होणार आहे. तरी या कार्यक्रमाला रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन वसंतलक्ष्मी एज्युकेशनल अँड मल्टिपर्पज फाउंडेशन बुलढाणा यांच्या वतीने करण्यात आले आहे.



