बुलढाणा, 8 एप्रिल (गुड इव्हिनिंग सिटी) ः निवृत्तीला अवघा दीड महीना उरला असतांना एखाद्या शिक्षकाला दुर्बुद्धी कशी सुचली, हा प्रश्न आहे. 58 वर्षीय वयोवृद्ध शिक्षकाने तीन विद्यार्थिनींना वासनांध भावनेने लाजेच्या अंगांना स्पर्श केल्याची संतापजनक घटना लोणीगवळीत समोर आली आहे. कुणालाही चीड आणि संताप येईल अशी घटना घडल्यामुळे गांवकऱ्यांनी शिक्षकाचा जीवच घेतला असता परंतु गावातीलच काही सुज्ञ मंडळींनी आणि डोणगांव पोलिस स्टेशनचे ठाणेदार श्री नागरे यांच्या तात्काळ हस्तक्षेपामुळे शिक्षक बचावला. आरोपी शिक्षक महादेव आत्माराम मानतोडे विरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेमुळे मात्र जिल्हा हादरला असून बदलापूर प्रकरणाच्या जखमा ताज्या झाल्या आहेत.
असे उघडकीस आले प्रकरण ?
गुड इव्हिनिंग सिटीला मिळालेल्या माहितीनुसार मेहकर तालुक्यातील लोणी गवळी येथील एका जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत हा प्रकार घडला. मागील तीन ते चार दिवसांपासून हा प्रकार सुरु होता. शिक्षक महादेव मानतोडे याने तिसऱ्या वर्गातील मुलींना विनयभंगाचे शिकार बनविले. अर्थात सदर प्रकरण उजेडात येण्यासाठी आजचा दिवस उजाडावा लागला. ‘काहीही झाले तरी मी शाळेत जाणार नाही’, असे एका मुलीने आपल्या आईला आज सांगितले. दररोज शाळेत जाणारी आपली मुलगी घरी का थांबत आहे, हे आईच्या लक्षात आले नाही. जेव्हा आईने आपल्या मुलीला विश्वासात घेवून विचारले, तेव्हा तिसऱ्या वर्गातील या विद्यार्थिनीने जे सांगितले, ते ऐकुन आई हादरून गेली. वर्गशिक्षक तिच्या मुलीला नको त्या ठिकाणी स्पर्श करीत होता. असे एक नव्हे सलग तीन दिवस झाले होते. तिच्याशिवाय इतर दोन मुलींसोबतही शिक्षक महादेव मानतोडे याने असेच विकृत कृत्य केले होते. ही बाब पिडीत मुलीच्या आईने तिच्या पतीला सांगितली. नंतर संतपलेल्या या पालकांनी इतर मुलींच्या कुटूंबियांशी संपर्क साधला आणि त्यांनाही मानतोडेची विकृती कथन केली. जवळपास दीडशेपेक्षा अधिक लोकांनी एकसोबतच शाळा गाठली. काही वेळातच संतापाचा स्फोट झाला. चिडलेल्या ग्रामस्थांनी आणि महिलांनी तातडीने शाळेवर धाव घेत नराधम शिक्षकाला पकडले आणि त्याला चांगलाच चोप दिला.
तीन तास तणावाचे वातावरण ः घटनेची माहिती मिळताच डोणगाव पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मात्र, संतप्त गावकरी आरोपीला पोलिसांच्या ताब्यात देण्यास तयार नव्हते. शिक्षकाच्या या घृणास्पद कृत्यामुळे गावकरी इतके संतापले होते की, त्यांनी पोलिसांना तब्बल तीन तास रोखून धरले. शाळेच्या परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता. अखेर पोलिसांनी गावकऱ्यांची समजूत काढली आणि कडेकोट बंदोबस्तात आरोपी मानतोडेला डोनगाव पोलिस ठाण्यात नेले.
निवृत्तीच्या दीड महिना आधी कृत्य ः विशेष म्हणजे, आरोपी शिक्षक महादेव मानतोडे हा येत्या 31 मे रोजी शासकीय सेवेतून सेवानिवृत्त होणार होता. सेवेची 30-35 वर्षे पूर्ण झाल्यानंतर आणि निवृत्तीला अवघा दीड महिना शिल्लक असताना या शिक्षकाने गुरु-शिष्याच्या पवित्र नात्याला काळिमा फासला आहे. आरोपी शिक्षक मानतोडेला पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा आहे. एक मुलगी वैद्यकीय शिक्षण घेत आहे, दूसरी आयटी सेक्टरमध्ये तर मुलगा दहावीमध्ये आहे. आरोपीविरोधात अपं क्र 104/2026 कलम 74,75.78,352 भारतीय न्याय संहीता सहकलम 8,12 बाल लैंगीक अत्याचार अधिनियम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‘साहेब चुक झाली, डोकं फिरलं होतं’ ः गुड इव्हिनिंग सिटीला मिळालेल्या माहितीनुसार वासनांध शिक्षकाला जेव्हा पोलिसांनी पकडले तेव्हा पोलिसांनी त्याला विचारले की, का असे केले ? तेव्हा शिक्षक मानतोडेने एव्हढंच म्हटले की, ‘साहेब चुक झाली, डोकं फिरलं होतं…’. निश्चीतच ही मानतोडेने पोलिसांनी दिलेली कबुलीच होती. एखाद्या आरोपीने स्वतःचा बचाव करतांना असेही म्हटले असते की, मी मुलींना चुकीच्या भावनेने स्पर्श केलेला नाही, त्यांनी त्याचा वेगळा अर्थ काढला, त्यात माझी चुक नाही’. असो, संपूर्ण आयुष्य पवित्र शिक्षकी पेशात घालविणाऱ्याने शेवटच्या क्षणी अपवित्र कृती करून आपल्या प्रतिष्ठेला धुळीस मिळविले, यात शंका नाही.



