spot_img

बसमध्ये जागा मिळविण्यासाठीची धडपड! गिरड्याच्या तरुणाचा अपघाती मृत्यू

बुलढाणा बसस्थानकावरील सुरक्षा व्यवस्था वार्‍यावर

बुलढाणा, 29 (गुड इव्हिनिंग सिटी) : बुलढाणा बसस्थानकावर रोज शेकडो प्रवासी प्रवास करीत असतात. त्याच दरम्यान प्रत्येक जण गाडीत जाग मिळाली पाहिजे यासाठी धडपड करताना दिसून येतात. कुणी रूमाल टाकण्यासाठी तर कुणी खिडकीतून उडी मारून बसचे आसन मिळाले पाहिजे यासाठी प्रयत्न करत असतात. बुलढाणा अजिंठा मार्गाने अनेक गावे आहेत त्यामध्ये शासनाकडून प्रवासाच्या विविध सवलती मिळत असल्याने एसटी बसने प्रवास करण्याला प्रवासी प्रधान्य देत असतात. पण याच दरम्यान कधी भांडण तर कधी चेंगराचेंगरी झाल्याच्या घटना अनेकवेळा घडल्या आहेत. त्यासाठी बुलढाणा बसस्थानकावर पोलीस चौकीत एक कर्मचारी आणि काही‌ सुरक्षारक्षक तैनात असताना सुध्दा अप्रिय घटना घडत आहेत. गिरडा येथील पोलीस भरतीची तयारी करणारा तरुण बसमध्ये चढत असताना तिथे झालेल्या चेंगराचेंगरीत गंभीर जखमी झाल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
गिरडा येथील पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी चेतन सुरेश‌ सोळंकी हा बुलढाण्याला येत होता. २७ एप्रिल रोजी चेतन हा घरी जाण्यासाठी बुलढाणा बसस्थानकावर आला पाच ते साडेपाच वाजताच्या दरम्यान मढ धाड गाडी लागली होती. गाडीतून प्रवास करण्यासाठी प्रवाशांनी गाडीजवळ गर्दी केली. यामध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत चेतन हा खाली पडला. त्याच्या अंगावर पाय दिले यामध्ये चेतन गंभीर जखमी झाला होता. सुरूवातीला त्याला बुलढाणा शहारातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु चेतन गंभीर जखमी असल्याने त्याला पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले. छत्रपती संभाजीनगर येथे उपचार सुरू असताना चेतनचा यामध्ये मृत्यू झाला.  यामुळे चेतनच्या परिवारावर शोककळा पसरली आहे. या घटनेची चौकशी करून एस टी महामंडळाने चेतनच्या परिवाराला मदत करावी अशी शिवसेना विभागप्रमुख राजेंद्र गायकवाड यांनी केली आहे. या घटनेमुळे बुलढाणा बसस्थानकावरील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत