जळगाव जामोद येथील कारवाई; परीक्षक भूमापकासह मुख्यालय सहाय्यकाविरुद्ध गुन्हा
बुलढाणा, 13 मे (गुड इव्हिनिंग सिटी) : प्लॉटवरील बांधकामाच्या शासकीय फी भरण्यासाठी केलेल्या ऑनलाइन अर्जातील त्रुटी दुरुस्त करून काम करून देण्यासाठी 10 हजार रुपयांची लाच स्वीकारताना जळगाव जामोद येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील दोन कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. ही कारवाई 12 मे रोजी करण्यात आली.
या प्रकरणातील आरोपींमध्ये परीक्षक भूमापक विश्वजीत विनायक सोनोने (वय 53) व मुख्यालय सहाय्यक सचिन सदाशिव वानखडे (वय 48) यांचा समावेश आहे. तक्रारदाराच्या प्लॉटच्या ऑनलाइन अर्जात त्रुटी असल्याचे सांगून त्या दुरुस्त करून पुढील कार्यवाही करण्यासाठी आरोपींनी 10 हजार रुपयांची मागणी केली होती. तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिल्यानंतर पडताळणी करण्यात आली.
त्यानुसार सापळा रचून उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय, जळगाव जामोद येथे आरोपींना लाचेची रक्कम स्वीकारताना पकडण्यात आले.
या प्रकरणी जळगाव जामोद पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती एसीबीने दिली. सदर कारवाई पोलिस अधीक्षक अमरावती बापू बांगर, अप्पर पोलिस अधीक्षक सचिन शिंदे, पोलिस उपअधीक्षक बुलढाणा भागोजी चोरमले यांच्या मार्गदर्शनात पीआय रमेश पवार, विलास घुशिंगे यांच्या नेतृत्वात हेकाँ दीपक जाधव, अमोल झिने, काँ. शैलेश सोनुने, रणजीत व्यवहारे, पंढरी शेळके, चालक पोकाँ अर्शद शेख, नापोकाँ नितीन शेटे यांच्या पथकाने पार पाडली.