जामठी परिसरातील इसमाला दोन महिन्यांसाठी बुलढाणा जिल्ह्यातून हद्दपार
धाड (बुलढाणा) : जामठी परिसरात अवैध रित्या दारू विक्री करणाऱ्या इसमाविरुद्ध धाड पोलिसांनी प्रतिबंधक कारवाई करत संबंधित आरोपीला दोन महिन्यांसाठी बुलढाणा जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील वाढत्या अवैध दारू विक्रीमुळे युवक व सर्वसामान्यांवर होणारे दुष्परिणाम लक्षात घेऊन ही कठोर कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
जिल्हा पोलिस अधीक्षक निलेश तांबे यांच्या सूचनेनुसार धाड पोलिस स्टेशन हद्दीत अवैध दारू विक्री करणाऱ्या इसम उर्फ अफसर बलदार बर्डे (वय ३८, रा. जामठी, ता. जि. बुलढाणा) याच्याविरोधात महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ५५ (१)(अ)(ब) अन्वये तडीपार प्रस्ताव सादर करण्यात आला होता. उपविभागीय दंडाधिकारी, बुलढाणा यांनी सुनावणीदरम्यान संबंधित इसमाविरुद्ध दाखल गुन्हे, प्रतिबंधक कारवाया तसेच परिसरातील अवैध दारू विक्रीमुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेत आदेश जारी केला.
त्यानुसार संबंधित आरोपीस १४ मे २०२६ रोजीच्या आदेशान्वये दोन महिन्यांसाठी बुलढाणा जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. अवैध दारू विक्री करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशाराही धाड पोलिसांनी दिला आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलिस अधीक्षक अमोल गायकवाड, उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली धाड पोलिस स्टेशनचे ठाणेदार प्रताप दत्तात्रय भोसे व त्यांच्या पथकाने केली.