spot_img

येळगांव धरणातून दिवसरात्र पाणी चोरी ः बुलढाणा नगर प्रशासनाचे दुर्लक्ष

बुलढाणा, १६ मे (गुड इव्हिनिंग सिटी) ः  शहरासह परिसरातील काही गावांना स्व. रामसिंग देवसिंग भोंडे जलाशय येळगांव धरणातून पाणीपुरवठा केला जातो. शहरवासियांची लाईफलाईन असलेले येळगांव धरण मात्र वार्‍यावर सोडल्यासारखे आहे. धरणाला लागून असलेल्या काही जलशत्रूंकडून दिवसरात्र पाण्याची चोरी सुरु असून नगर प्रशासनाचे त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. गुड इव्हिनिंग सिटीकडे पाणीचोरीबाबत पक्की माहिती आहे. जवळपास १०० पेक्षा अधिक मोटारी, ज्यांची वहनक्षमता ३ ते ५ हॉर्सपॉवर आहे, त्यांच्या माध्यमातून स्वतःच्या विहीरींमध्ये पाणी साठा केला जात आहे. पिण्यासाठी आरक्षित असलेले हे पाणी परिसरातील इतर शेतकर्‍यांना विकले जात असल्याची धक्कादायक माहिती आहे. गुड इव्हिनिंग सिटीच्या बातमीमुळे प्रशासनाला जाग यावी, हे दुर्दैव आहे. नगर परिषदेच्या स्वतःच्या यंत्रणेने वेळोवेळी याबाबत खातरजमा करून स्थल निरीक्षण केले पाहीजे. आजही जर ड्रोन कॅमेरा लावून धरण परिसरात फिरविले तर पाणी चोरणार्‍यांचा पर्दाफाश होवू शकते.
आजमितीस जुलैच्या मध्यापर्यंत पुरेल एव्हढाच जलसाठा धरणात आहे. अर्थात ही आकडेवारी नगर प्रशासनाने त्या हिशोबाने धरली की, कुठेही पाणीचोरी होत नाही. परंतु दिवसरात्र जर पाण्याचा उपसा होत असेल तर धरणाचे पाणी किती दिवस पुरेल, ही शंका आहे. पाणी चोरणारे चोरण्यासोबत ते विकण्याचेही दुष्कृत्य करीत आहेत. नगर प्रशासनाने वेळीच लक्ष दिले नाही तर पाण्यासाठी त्राहीमाम होण्याची दाट शक्यता आहे. ज्यापद्धतीने सूर्याचा प्रकोप सुरु आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याचे बाष्पीभवन सुद्धा होत आहे. दोन्ही कारणांमुळे पाण्याच्या पातळीत कमालीची घट होत आहे.

मोटार जप्तीची कारवाई करू ः नयन शर्मा
नगर परिषदेचे पाणी पुरवठा सभापती नयन शर्मा यांना जेव्हा आम्ही सदर माहिती दिली, तेव्हा त्यांनी याबाबत गंभीरतेने कारवाईची गरज व्यक्त केली. ‘जनतेसाठी पिण्याचे पाणी महत्वाचे आहे.. जर या पाण्याची चोरी होत असेल तर त्याविरोधात नगर परिषदेमार्फत निश्चीतच कारवाइई केली जाईल. यात कुणाचीही गय केली जाणार नाही’, या शब्दांत नयन शर्मा यांनी निर्धार व्यक्त केला आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत