बुलढाणा, १९ मे (गुड इव्हिनिंग सिटी) ः : शहरातील गजबजलेल्या संगम चौकात एका कारने अचानक पेट घेतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. नागरिकांनी सामूहिक प्रयत्नातून आग विझविल्याने पुढील अनर्थ टळला. तरी कारचे चांगलेच नुकसान झाले आहे. धामनगांव बढे येथील रियाज पटेल नियमीत तपासणीसाठी संगम चौकातील डॉ. कोठारी यांच्या हॉस्पीटलमध्ये दुपारी ३.१० च्या सुमारास इंडीगो वाहन क्र. एमएच ०४ इएक्स ७४२० सहदाखल झाले. हॉस्पीटलसमोरील रस्त्याच्या विरूद्ध दिशेला कार लॉक करून ते पेंशटला आत घेवून गेले. इकडे मात्र कारच्या बोनेटमधून अचानक धुवा निघायला सुरुवात झाली. काही कळायच्या आतच कारने पेट घेतला. आत गेलेल्या रियाज पटेलांना लोकांनी आवाज दिला. दूसर्याच क्षणाला आजूबाजूला उभ्या असलेल्या लोकांनी जे साधन मिळेल त्याने पेटलेल्या गाडीवर पाणी टाकायला सुरुवात केली. एकत्रीतपणे पाण्याचा मारा झाला आणि कार पूर्ण जळायच्या आधी विझविण्यात सर्वांना यश आले. कारची बॅटरी आणि आतील मोठा भाग मात्र जळून गेला होता. जर आग विझली नसती तर समोर आणि मागे उभ्या असलेल्या वाहनांनीही पेट घेतला असता. मोठा अनर्थ टळला. सूर्याच्या प्रखर उष्णतेचा हा परिणाम असावा, असा अंदाज व्यक्त होत आहे.



