दोन पीडित महिलांची सुटका, तिघांना अटक
बुलढाणा, 26 मे (गुड इव्हिनिंग सिटी) : मलकापूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महावीर नगर, वाकोडी शिवार परिसरात सुरू असलेल्या एका अनैतिक कुंटणखाना अड्ड्यावर पोलिसांनी धाडसी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी दोन पुरुष आणि एका महिला आरोपीला ताब्यात घेतले असून, दोन पीडित महिलांची सुटका केली आहे. घटनास्थळावरून रोकड आणि मोबाईलसह एकूण ३३ हजार १६५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दिनांक २५ मे रोजी मलकापूर शहर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी गस्तीवर होते. यादरम्यान पोलिसांना खात्रीशीर माहिती मिळाली की, महावीर नगर येथील एका घरात एक महिला आणि एक पुरुष काही महिलांना आणून त्यांच्याकडून बळजबरीने अनैतिक देहव्यापार करून घेत आहेत.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने तात्काळ महावीर नगर येथील संशयित घरावर छापा टाकला. यावेळी घरात एक ग्राहक आणि दोन पीडित महिला मिळून आल्या. पोलिसांनी आरोपींना रंगेहात पकडून ताब्यात घेतले. या प्रकरणी मलकापूर शहर पोलीस ठाण्यात कलम ३, ४, ५, ७ पीटा ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून खालील आरोपींना अटक करण्यात आली आहे त्यामध्ये संतोष हरिभाऊ वाघ, उघडा पांडुरंग तांदूळकर एक महिला आरोपी यांना ताब्यात घेण्यात आले आहे. जप्त केलेल्या मालामध्ये रोख रक्कम २ हजार ५०० रुपये, तीन मोबाईल फोन अंदाजे किंमत ३० हजार रुपये इतर साहित्य, ३३ हजार १६५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदरची धडक कारवाई बुलढाणा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड सर, अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा, आणि माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तसेच मलकापूर शहरचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या आदेशाने या कारवाईचे नियोजन करण्यात आले.
या धडक कारवाईत पोलीस उपअधिक्षक सागर कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक यशोदा कणसे, पोलीस अंमलदार राजेंद्र टेकाळे, अनुपकुमार मेहेर, सतीश हाताळकर, विजय वारुळे, अमोल वनारे, मंगेश सनगाळे, महिला पोलीस अंमलदार कोमल इंगळे, दिपाली चव्हाण, चालक पोलीस अंमलदार समाधान टेकाळे तसेच स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणाचे पोलीस अंमलदार वैभव निंबाळकर आणि चालक ए.एस.आय. कोसे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पुढील कायदेशीर कार्यवाही मलकापूर शहर पोलीस करीत आहेत.