बुलढाणा, 27 जून (गुड इव्हिनिंग सिटी) : यापूर्वीही मेहकर येथे अवैध गर्भपात आणि गर्भलिंगनिदान करणाऱ्या टोळीचा प्रदा फास्ट करण्यात आला होता. पुन्हा एकदा त्याच ठिकाणी अवैध आणि बोगस वैद्यकीय व्यवसायाविरुद्ध प्रशासनाने एक मोठी आणि धडक कारवाई केली आहे. आरोग्य उपसंचालक डॉ. सुशील वाकचौरे आणि बुलढाण्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार यांना मिळालेल्या अत्यंत गोपनीय माहितीच्या आधारे, मेहकर जवळील प्रतापूर येथे सुरू असलेल्या अवैध गर्भलिंगनिदान केंद्रावर छापा टाकून एका बोगस डॉक्टरला पोर्टेबल सोनोग्राफी मशीनसह रंगेहात अटक करण्यात आली आहे. महत्वाची बाब या डॉक्टरला आश्रय देणाऱ्या घरमालकाविरोधाताही कारवाई करण्यात आली आहे. गुड इव्हिनिंग सिटीने दिलेल्या फोटोत दाढी ठेवलेला बोगस डॉ अनिल रामदास सोनुने राहणार हिंगोली त्याच्या बाजूचा चष्मा घातलेला अमोल रमेश रसाळ घरमालक राहणार प्रतापूर आहे
अत्यंत सूक्ष्म नियोजन करून एक संयुक्त कारवाई पथक तयार करण्यात आले होते. आज, दिनांक २७ जून रोजी दुपारी ठीक ४ वाजताच्या सुमारास या पथकाने प्रतापूर येथील अमोल रमेश रसाळ यांच्या घरावर छापा टाकला. या छाप्यादरम्यान, हिंगोली येथील रहिवासी असलेला बोगस डॉक्टर अनिल रामदास सोनुने हा एका महिलेचे अवैध गर्भलिंगनिदान करत असताना आढळून आला. पथकाने त्याला जागेवरच पकडले असून, त्याच्याकडून बेकायदेशीररित्या वापरली जाणारी पोर्टेबल सोनोग्राफी मशीन आणि इतर वैद्यकीय साहित्य जप्त केले आहे.
या धडक मोहिमेत आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे कामगिरी बजावली. या टीममध्ये डॉ. सुनिता हिवसे वैद्यकीय अधीक्षक, मेहकर, ग्रामीण रुग्णालय मेहकर येथील मंगला वायाळ सिस्टर, प्रशांत बोरे अधिपरिचारक आणि शंकर वायाळ वरिष्ठ लिपिक, मेहकर शहरचे पोलीस निरीक्षक आलेवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक बिरांजे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राठोड, तसेच पोलीस हेडकॉन्स्टेबल लक्ष्मण कटक, शिवनकर, संदीप भोंडाने, पोलीस कॉन्स्टेबल मोहम्मद परसुवाले, केशव अवचार आणि महिला पोलीस कॉन्स्टेबल सरकटे यांचा समावेश होता. पकडण्यात आलेल्या बोगस डॉक्टर आणि त्याच्या सहकाऱ्यांवर कायदेशीर कडक पावले उचलण्यात आली आहेत. संशयित आरोपींवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासनाच्या या संयुक्त आणि धाडसी कारवाईमुळे जिल्ह्यात बेकायदेशीर गर्भलिंगनिदान करणाऱ्या आणि बोगस प्रॅक्टिस करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.




