बुलढाणा, 4 जुलै (गुड इव्हिनिंग सिटी) : बुलढाणा-अजिंठा महामार्गावर निसर्गरम्य परिसरात वसलेल्या गिरडा गावाचा आता संपूर्ण कायापालट होणार आहे. संत स्वयंप्रकाश महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या क्षेत्राचा श्री संत गजानन महाराज संस्थान, शेगाव यांच्या माध्यमातून विकास केला जात असून, या संदर्भातील एका महत्त्वपूर्ण विकास आराखड्याचा आढावा राज्याचे महसूलमंत्री बावनकुळे यांनी काल, ३ जुलै रोजी मंत्रालय, मुंबई येथे झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत घेतला. अजिंठा पर्वत रांगेत असलेले गिरडा गाव हे समृद्ध वनसंपदा आणि अलौकिक नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखले जाते. गेल्या काही वर्षांपूर्वी येथील संत स्वयंप्रकाश महाराज मंदिर परिसराचा भाग श्री संत गजानन महाराज संस्थानकडे हस्तांतरित करण्यात आला होता. तेव्हापासूनच संस्थानने या परिसराच्या विकासासाठी विविध कामे हाती घेतली आहेत. याच मालिकेतील पुढील टप्प्यासाठी मंत्रालयात या विशेष आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला संबंधित विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
प्रस्तावित भव्य प्रकल्प आणि सुविधा
गिरडा येथील वृक्षपट्टा संवर्धन योजनेअंतर्गत प्राप्त झालेल्या शासकीय जमिनीवर श्री गजानन महाराज संस्थानतर्फे जागतिक दर्जाच्या सोयी-सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने संत स्वयंप्रकाश महाराज यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा जपणारे आधुनिक स्मृतीकेंद्र व प्रदर्शन केंद्र उभारण्यात येईल. निसर्गाच्या सानिध्यात पर्यटकांना आणि भाविकांना शांतता लाभावी यासाठी इको टुरिझम आणि शांतिकुटीरची निर्मिती केली जाईल. येथे एक अत्याधुनिक रुग्णालय, आयुर्वेदिक संशोधन केंद्र आणि निसर्गोपचारासाठी ‘नॅचरोथेरपी केंद्र’ सुरू करण्यात येणार आहे. दूरवरून येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी भव्य निवास संकुल, सभागृह आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी ‘खुला मंच’ तयार केला जाईल. स्थानिक रोजगाराला चालना देण्यासाठी ग्रामीण कुटीर उद्योगांची उभारणी केली जाणार आहे, ज्यामुळे परिसरातील नागरिकांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील. गिरडा परिसराला धार्मिक आणि पर्यटन दृष्ट्या मोठे महत्त्व आहे. श्री संत गजानन महाराज संस्थानतर्फे होणाऱ्या या विकासकामांना गती देण्यासाठी प्रशासनाने सर्व आवश्यक परवानग्या आणि सहकार्य तातडीने उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश महसूलमंत्री बावनकुळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना बैठकीत दिले. गिरडा हे गाव केवळ एक पवित्र तीर्थक्षेत्रच नव्हे, तर जिल्ह्यातील एक प्रमुख निसर्ग पर्यटन आणि आरोग्य केंद्र म्हणून नावारूपास येणार आहे.





