◾ लढाऊ वैमानिकाचे मन… विषयावर व्याख्यान देणार
बुलढाणा, 29 जून (गुड इव्हिनिंग सिटी) : व्रिक्ष फाउंडेशनच्या वतीने स्व. अरुणाताई कुल्ली यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित ‘अरुणोत्सव’ या उपक्रमांतर्गत यंदाच्या पाचव्या वर्षी विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात इस्रोच्या गगनयान मोहिमेसाठी निवड झालेले भारतीय वायुदलाचे ग्रुप कॅप्टन अंगद प्रताप हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम बुधवार, १ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता गर्दे हॉल बुलढाणा येथे आयोजित करण्यात आला आहे.
“लढाऊ वैमानिकाचे मन, अंतराळवीराचे हृदय” (The Mind of a Fighter Pilot, the Heart of an Astronaut) या विषयावर ते मार्गदर्शन करणार असून, विज्ञान, संरक्षण आणि अंतराळ क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या युवकांसाठी हे व्याख्यान प्रेरणादायी ठरणार आहे.
यावेळी अरुणाई पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून, पुरस्काराचे सरकारमूर्ती दत्तात्रय श्रीराम लहाने (अध्यक्ष, मानस फाउंडेशन, बुलढाणा) हे असतील.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कर्नल सुहासराव जतकर (से.नि.), माजी संचालक, सैनिक कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य राहणार आहेत. प्रमुख पाहुण्या म्हणून बुलढाणा नगराध्यक्षा सौ. पूजाताई संजय गायकवाड उपस्थित राहतील. तसेच कॅप्टन एम. महेंद्र कुमार (नवी दिल्ली) आणि गर्दे वाचनालयाचे सचिव उदय देशपांडे यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.
व्रिक्ष फाउंडेशन, प्रगती सार्वजनिक वाचनालय आणि भगतरंग क्रीडा, शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमास नागरिक, विद्यार्थी, विज्ञानप्रेमी आणि युवा वर्गाने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सुजाताताई कुल्ली यांनी केले आहे.




