spot_img

सुरेश जी देवकर’: येथे जुळती माझे कर..!

सुरेश देवकर सर…केवळ बुलढाणा जिल्ह्यातच नाही अलीकडे महाराष्ट्रात सर्वदूर पोहोचलेलं सहकार क्षेत्रातील असं नाव, जे उच्चारताच मनामध्ये आदरभाव निर्माण होईल.. सहकार चळवळीत आघाडीवर असलेल्या बुलढाण्यातून देवकर सरांनी ‘अदिती अर्बन’ ही पतसंस्था सुरू करून विश्वासाहर्ता आणि माणुसकी जपली आहे. ‘अदिती अर्बन’ चा उंचावत असलेला प्रगतीचा आलेख आणि सुरुवातीचा काळ, याचे असंख्य साक्षीदार असतील. परंतु माझ्या नजरेतून गेल्या पाच – सहा वर्षापासून पतसंस्थेची प्रगती बघितली तर, अनेक महत्त्वाच्या बाबी अधोरेखित करता येतील. अदिती अर्बन पतसंस्थेने एक संस्था म्हणून नंतर, आधी परिवार म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे. ग्राहकांप्रती विश्वास आणि जिव्हाळा या दोन मानवी नातेसंबंधांना अंगिकारून संस्थेने सुरक्षिततेची हमी कायमच दिली आहे. तळागाळातील असंख्य माणसांना देवकर सरांनी जोडले आहे. व्यवहारातून केवळ माणसं जोडली नाही तर, त्यांच्या वेदना वेचल्या, दुःख झेलले, कठीण काळात आधार दिला.. सरांचा हा सद्भावपूर्ण व्यवहार आपुलकी देणारा आहे.. दिवसेंदिवस विस्तारत चाललेल्या पतसंस्थेचे कामकाज सांभाळत असताना, सरांनी तरबेजांना नाही तर होतकरू, शिकाऊ उमेदवारांना प्राधान्य दिले. दिलेल्या कामात परिपक्व करून त्यांची प्रतिभा आणि जीवनमान उंचावले आहे.. ‘नवा गडी तयार झाला पाहिजे’, एक एक्सपर्ट नको, अनेक एक्सपर्ट्स तयार करा, त्यांच्यावर नवनवीन जबाबदारी द्या’ त्यांना मोठं करा आपण आपोआप आणखी मोठे होऊ” सरांचा हाच विचार अतिशय प्रेरणादायी ठरला आहे. यामुळेच, त्यांच्या प्रति वेळोवेळी कृतज्ञता व्यक्त केली जाते. बुलढाण्याच्या सामाजिक क्षेत्रात वेळोवेळी सहकार्य करत उपक्रमांना मदत करून खऱ्या अर्थाने सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रासाठी आधारस्तंभ ठरलेल्या देवकर सरांनी जिल्ह्याचा नावलौकिक वाढवला आहे. पत्रकारांना आर्थिक दृष्ट्या आणि संवेदनायुक्त पत्रकारितेला पुनरुज्जीवीत करण्यासाठी तीन वर्षांपूर्वी सरांनी वृत्तपत्र विश्वात पदार्पण केलं.. माध्यम क्षेत्रात टिकून राहण्याचे आव्हान असताना विदर्भ – मराठवाड्यात दैनिक महाभूमीने मोठी झेप घेतली… निश्चितच यामागे, सरांची दूरदृष्टी होती. “मी केवळ दुनियेमध्ये आलो नाही जगण्यासाठी, दुनिया माझ्या हिश्चाची मी हिरवी केली आहे.. आणि आयुष्याने ज्या आयुष्याची माती माती केली, त्या मातीची मी मूर्ती केली आहे” ह्या ओळी सरांच्या व्यक्तिमत्वाला अगदी तंतोतंत लागू पडतात. सहकार, माध्यम क्षेत्रातील अविरत योगदानासोबतच शिक्षकांच्या न्यायासाठी सर सातत्याने झटत आहेत. मुळात, आदिती अर्बनचे अध्यक्ष होण्याआधी शिक्षकी पेशात असलेली ही व्यक्ती, हजारो शिक्षकांसाठी प्राणप्रिय आहे.. याच श्रृंखलेत शिक्षक भारतीच्या विभागीय अध्यक्ष पदाला परिपूर्ण न्याय देऊन अमरावती विभागात कर्तुत्वाचा ठसा उमटवणाऱ्या देवकर सरांनी आदर्श प्रस्थापित केला आहे..

केवळ आर्थिक, माध्यम आणि शिक्षण क्षेत्रातच नाही, तर सामाजिक कार्याचा वसाही त्यांनी अविरत सुरू ठेवला आहे. कोरोनासारख्या कठीण काळात किंवा नैसर्गिक आपत्तीच्या वेळी, सर्वसामान्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे देवकर सर हे एक ‘संकटमोचक’ म्हणूनही परिचित आहेत. ‘शिक्षक भारती’च्या व्यासपीठावरून त्यांनी शिक्षकांचा आवाज बनून जे लढे उभारले, त्यामुळेच ते आज हजारो शिक्षकांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. संत तुकाराम महाराजांचा विद्रोह आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्यप्रेम हे त्यांच्या विचारांचे अधिष्ठान आहे. व्यवस्थेतील त्रुटींवर भाष्य करताना, ते नेहमी रचनात्मक दृष्टिकोन ठेवतात. पत्रकारितेच्या क्षेत्रात ‘महाभूमी’च्या माध्यमातून त्यांनी ‘सकारात्मक पत्रकारिता’ आणि ‘लोकशाहीच्या मूल्यांचे जतन’ हा ध्यास घेतला आहे. तटस्थ राहून समाजाचे प्रश्न मांडण्याची त्यांची जिद्द पत्रकारितेच्या क्षेत्रातील नव्या पिढीसाठी नक्कीच मार्गदर्शक आहे… समाजाच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेल्या या नेतृत्वापुढे कायम असंख्य हात विनम्रपणे जोडलेले असतात.. म्हणूनच, येथे जुळती माझे कर…

सरांना वाढदिवसाच्या मनस्वी शुभेच्छा…💐

~ ✍🏻शब्दाभिषेक 7057029288

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत