खामगावशी जोडले जाणेच मोताळा तालुक्यासाठी हिताचे!* बुलढाणा – जिल्ह्याच्या घाटाखालील ७ तालुक्यातील नागरिकांच्या प्रशासकीय कामकाजाच्या सुविधेसाठी खामगांव येथे नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालयाची निर्मिती प्रस्तावित आहे.या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने गेल्या पंधरवड्यात नागरिकांकडून आक्षेप,हरकती व सुचना मागवल्या होत्या.प्राथमिक माहितीनुसार,मोताळा तालुक्यातून ६ हरकती दाखल झाल्याचे समजते.मोताळा तालुका वासियांना ५०कि.मी.वर असलेले खामगांव शहर दूर आणि २२कि.मी.वरील बुलढाणा शहर जवळ वाटते.अनेक वर्षांपासूनची अंगवळणी पडलेली बुलढाण्याची वहिवाट हेही एक कारण असावे.खामगांवला होणा-या नव्या अपर जिल्हाधिकारी कार्यालयाला जोडल्या जाण्याचा प्रस्ताव मोताळा तालुक्यातील काही नागरिकांना प्राथमिक टप्प्यावरच गैरसोईचा वाटल्यामुळे,तालुका पूर्ववत राहू द्या बुलढाण्यालाच जोडून!असा सूर ऐकू येत आहे.पण यानिमित्ताने मोताळा तालुक्यातील नागरिकांना चिंतन करून स्वहिताचा सर्वंकष विचार करता येईल. येत्या काळात खामगांव जिल्हा,खामगांव लोकसभा मतदारसंघ त्याच बरोबर स्वतंत्र मोताळा विधानसभा मतदार संघ अस्तित्वात येण्याची चिन्हे आहेत.राज्यातील व देशातील वेगवान राजकीय घडामोडी व नवनवीन समिकरणे पाहता लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची संख्या वाढवण्यासाठी व नव्या रचनेसाठी हालचाली चालल्याचे दिसत आहे.महिला आरक्षणासाठीच्या नारी शक्ती वंदना कायद्यात दुरूस्ती आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयकासाठी ३६२खासदारांचे बहुमत जुळवण्याचे केंद्र सरकारचे प्रयत्न चालले आहेत.देशातील खासदारांची व आमदारांची संख्या दीड पटीने वाढवण्याची सत्ताधा-यांची योजना आहे.नजीकच्या काळात त्याला मूर्त रूप येऊ शकते. परिणाम बुलढाणा जिल्ह्यात नवा खामगाव लोकसभा मतदारसंघ व घाटाखाली दोन आणी घाटावर एक अशा तीन विधानसभा मतदारसंघाची भर पडेल असे बोलले जाते. या पार्श्वभूमीवर मोताळा तालुक्याला राजकीय भवितव्य व
परिवर्तनशील काळाची पावले वेळीच ओळखावी लागतील.बुलढाण्याच्या अंतराच्या तुलनेत मोताळ्याहून खामगावला जाण्यासाठी ३०कि.मी.अधिक अंतराचा फेरा वाढतो एवढ्या कारणावरून मोताळा तालुक्याच्या भविष्याची,राजकीय, सामाजिक व विकासाची वाट रोखणार का?खामगावच्या अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या विषयाकडे सिमीत नजरेने पाहून विरोध करणे असंयुक्तिक व अहितकारक ठरू शकते खामगावच्या प्रस्तावित अपर जिल्हाधिकारी कार्यालयाशी मोताळा तालुक्याला जोडू नये अशी मागणी बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांना भेटून तर शिवसेना उबाठाच्या नेत्या जयश्रीताई शेळके यांनी विभागीय आयुक्तांना भेटून केली आहे.मोताळा तालुका हा बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचा मोठा हिस्सा असल्याने या दोन्ही नेत्यांनी जनभावनेचे कारण सांगत राजकीय सोयीसाठी मागणी रेटणे स्वाभाविक असेलही.पण याचवेळी मोताळा तालुक्यातील नागरिकांनी सजगतेने आपल्या मातीची अस्मिता व राजकीय,सामाजिक अस्तित्वाच्या अनुषंगाने चिंतन करायला हवे.बुलढाणा विधानसभा मतदारसंघात असलेल्या मोताळा तालुक्याच्या वाट्याला पूर्वापार राजकीय परावलंबित्व आणी दुय्यम स्थान वाट्याला येत गेले.अशी भावना क्षीण आवाजात व्यक्त होते.स्थानिक नेतेमंडळीतील एकमताअभावी ‘घाटाखालचा उमेदवार’ असे चित्र विधानसभा निवडणूकीसाठी कधी तयारच झाल्याचे दिसले नाही.याचा लाभ घाटावरच्या नेत्यांच्या पदरात पडत गेला. परिणामस्वरूप मोताळा तालुक्यातील लोकांना छोट्या मोठ्या कामासाठी नागमोडीचा राजूर घाट चढणे अंगवळणी पडले. अपवाद फक्त १९७८ च्या विधानसभा निवडणूकीचा.बुलढाणा मतदारसंघातून तपोवन(मोताळा)चे शिवाजीराव भिकनराव पाटील हे निवडून आले व शरद पवारांच्या ‘पुलोद’मंत्रीमंडळात पाटबंधारे राज्यमंत्री झाले.पण सरकार अल्पावधीतच पडले आणि शिवाजीरावही १९८०च्या विधानसभा निवडणूकीत हरले.तेव्हापासून म्हणजेच सलग ४६ वर्षापासून घाटावरील नेतेच विधानसभेवर निवडून गेले.
जिल्ह्याची शिखर संस्था असलेली जिल्हा सहकारी बँक असो की जिल्हा परिषद. एखाद सभापतिपद देऊन मोताळा तालुक्यातील नेत्यांची राजकीय बोळवण होत गेली.घाटाने आम्हाला कायमच गृहीत धरले,घाटाच्या सावलीत आमची वाढ झाली नाही अशी खंत मोताळा तालुक्यातून दबक्या सुरात ऐकायला मिळत असते.सुदैवाने यापुढे या तालुक्याचे नष्टचर्य संपवणारे दिवस आता जवळ येऊ लागले आहेत.घाटाखाली खामगांव जिल्हा व खामगाव लोकसभा मतदारसंघ त्याचबरोबर मोताळा व शेगाव हे नवे विधानसभा मतदारसंघ येत्या काळात अस्तित्वात येण्याची दाट शक्यता राजकीय वर्तुळात अलिकडच्या काळात चर्चिली जात आहे.जिल्ह्याच्या भौगोलिक रचनेनुसार खामगांव जिल्हा व खामगाव लोकसभा मतदारसंघाशी मोताळा तालुका संलग्नित केला जाणे स्वाभाविक असणार आहे.अशा परिस्थितीत मोताळा तालुक्याने विरोधाचा सूर आळवून खामगावशी अंतर ठेवणे हिताचे कसे ठरेल? भविष्यात नवा जिल्हा,नवा लोकसभा मतदारसंघ तसेच संभाव्य मोताळा विधानसभा मतदारसंघ आदी मोठ्या परिवर्तनाच्या संधी दृष्टीपथात असल्याने मोताळा तालुक्यातील नागरिकांनी काळाची पावले ओळखत ‘खामगांव’शी जुटण्याची मानसिकता तयार करावी लागेल.मोताळा तालुक्याला बुलढाणा हा अंतराच्या दृष्टीने जवळ वाटतो. पण कायम सत्ताकेंद्राचा वरचष्मा ठेवत आलेल्या बुलढाण्याने राजकीय लाभाच्या व विकासाच्या दृष्टीने मोताळयाला आजवर किती जवळचे समजले आहे? असा प्रश्न नवी पिढी जुन्या पिढीला आता विचारू लागली आहे.
बुलढाणा जिल्ह्याच्या घाटावरील सहा तालुक्यांचे क्षेत्रफळ ४९२८चौ.कि.मी.तर घाटाखालील सात तालुक्यांचे क्षेत्रफळ ४७२७ चौ.कि.मी.आहे.म्हणजेच घाटमाथ्याचे व घाटाखालचे क्षेत्रफळ जवळ जवळ सारखेच आहे. घाटाची लोकसंख्या १२,९४,६३३ तर घाटाखालील लोकसंख्या १२,९१,६०५ म्हणजेच जवळ जवळ सारखीच आहे.
तात्पर्य,क्षेत्रफळ व लोकसंख्येची समानता आणि घाटमाथा व घाटाखालील भागाची भौगोलिक रचना ही भविष्यात खामगांव जिल्ह्याच्या निर्मितीस पुरक ठरणारी आहे.त्याच अनुषंगाने खामगावला नव्याने झालेले उप प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि आता होऊ घातलेल्या अपर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाहता येईल.मोताळा तालुक्यातील नागरिकांना शैक्षणिक व वैद्यकीय कामासाठी बुलढाणा,बाजारपेठेसाठी मलकापूर तर जिल्हास्तरीय प्रशासकीय कामासाठी खामगाव असे पर्याय आहेत.खामगांव आम्हाला दूर पडते असे सांगणे म्हणजे परिवर्तनाची नवी संधी नाकारण्यासारखे होईल.मोताळा तालुक्याला आपले अस्तित्व व अस्मितेसाठी आत्मभान व नवा आशावाद जागृत करावा लागेल.भविष्यात मोताळा तालुक्याच्या विकासाचा सुर्योदय ‘पूर्वेकडून ‘होण्याची चिन्हे दिसत आहेत.मोताळा तालुकावासियांनी यावर सारासार विचार करावा




