बुलढाणा, 17 जुलै (गुड इव्हिनिंग सिटी) : अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या दानावर डल्ला मारणारे चोर कधी पकडले जातील माहित नाही परंतु बुलढाणा पोलिसांनी मात्र अवघ्या काही तासाच्या आत कऱ्हाळे ले आउट मधील मंदिरात चोरी करणाऱ्या चोराच्या मुसक्या आवळल्या. बुलढाणा शहरातील मलकापूर रोड परिसरातील कऱ्हाळे ले-आऊट येथील प्रसिद्ध सिद्धेश्वर महादेव मंदिरात झालेली चोरी उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेला अवघ्या २४ तासांच्या आत यश आले आहे. पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याच्याकडून चोरीला गेलेला मुद्देमाल जप्त केला आहे.
मंदिरातील चांदीचे दागिने आणि पितळी साहित्य लंपास काल १६ जुलै रोजी सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेच्या दरम्यान कऱ्हाळे ले-आऊट येथील सिद्धेश्वर महादेव मंदिरात एका अज्ञात चोरट्याने प्रवेश केला होता. चोरट्याने मंदिरातील तांबे-पितळेचे साहित्य आणि देवाचे चांदीचे दागिने असा एकूण १८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. याप्रकरणी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तातडीने तपास सुरू केला. घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपी आकाश बाहेती रा. पवार ले-आऊट, सोळंकी हॉस्पिटलच्या मागे, बुलढाणा येथून ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीला गेलेला मुद्देमाल किंमत १८ हजार ५०० रुपये जप्त केला आहे.
तांब्याच्या दोन लहान व मोठ्या घंगाळ ६ हजार रुपये, पितळी समई २ हजार रुपये, पितळी नंदादीप ३०० रूपये,
देवाचे चांदीचे एकूण ४ डोळे आणि नाक किंमत १० हजार रुपये असा माल जप्त केला आहे. सदरची कारवाई एसपी निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आशिष रोही यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी पथकातील एपीआय सुनील इंगळे, पोलीस अंमलदार दीपक लेकुरवाळे, पोलीस अंमलदार एस. के. चांद यांनी बजावली आहे.




