spot_img

उपवर्गीकरण विरोधात २९ जुलैला जिल्हास्तरीय महामोर्चा – मागावर्गीयांमध्ये फूट पाडण्याचे षडयंत्र हाणून पाडू ः दिलीपराव जाधव

बुलढाणा, २० जुलै (गुड इव्हिनिंग सिटी) ः अनसूचित जातीच्या उपवर्गीकरणाला महाराष्ट्रातील ५९ जातींर्पकी ५८ जातींचा मोठ्या प्रमाणात विरोध असून मागासवर्गीयांमध्ये फूट पाडत समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम फडणवीस सरकार करीत असल्याचा मोठा आरोप उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समितीने केला आहे. ‘भाजप आणि संघपरिवाराचे हे षडयंत्र हाणून पाडण्यासाठी सर्वांनी उपवर्गीकरण विरोधात २९ जुलै रोजी आयोजित जिल्हास्तरीय महामोर्चामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
आज, येथील पत्रकार भवनमध्ये समस्त आंबेडकरी समाज व अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समिती बुलढाणा जिल्हा यांच्यावतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. समितीच्या वतीने समाजभूषण दिलीपराव जाधव, कुणाल पैठणकर, प्रा. डी.आर. माळी, आशिषबाबा खरात, विनोद इंगळे, अमोल खरे, निलेश गायकवाड, प्रतिक जाधव, दिलीप राजभोज, विजय राऊत, संजय मोरे आदिंनी महामोर्चाच्या आयोजनाची पत्रकारांना माहिती दिली. बुधवार, २९ जुलै २०२६ रोजी सकाळी ११ वाजता जिजामाता प्रेक्षागार येथून महामोर्चा काढला जाणार आहे. उपवर्गीकरणाची प्रक्रिया महाराष्ट्र शासनाने तत्काळ रद्द करावी, अनंत बदर समितीचा तात्काळ सार्वजनिक करून सदर समिती रद्द करावी, सर्व अनुशेष पदे तात्काळ भरावी, यासह इतर मागण्या घेवून महामोर्चा काढला जाणार असल्याची माहिती समितीने दिली. यावेळी दिलीपराव जाधव म्हणाले की, मागासवर्गीय समाजाात फूट पाडून त्याचा फायदा घेण्याचे षडयंत्र सुरु आहे. काही जणांची दिशाभूल केली जात आहे, त्यांना आमिषे दाखविली जात आहे. जर निवेदने देवून, आंदोलन करून शासनाने आमची दखल घेतली गेली नाही तर आम्हांला क्रांतीशिवाय पर्याय उरणार नाही, असा इशाराही श्री जाधव यांनी दिला. उपवर्गीकरणाच्या आडून संपूर्ण आरक्षण व्यवस्थाच सरकारला संपवायची असल्याचे कुणाल पैठणकर म्हणाले. ‘जे मातंग बाधव हे समजून घेत आहेत, त्यांचा उपवर्गीकरणाला विरोध आहे. असे अनेक मातंगबंधू महामोर्चामध्ये येणार आहे, असा दावा पैठणकर यांनी केला. प्रा. डी.आर. माळी यांनी चर्मकार समाजाचा याला विरोध असून चर्मकार समाज बांधव मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणावर सहभागी होणार असल्याची माहिती दिली. अमोल खरे यांनी प्रत्येक मागासवर्गीयाने मोर्चात सहपरिवार सहभागी व्हावे, असे आवाहन केले. तर आशिषबाबा खरात यांनी थेट फडणवीस सरकारवर निशाणा साधत त्यांनीच समाजात तेढ निर्माण करण्याचा घाट घातला असल्याचा आरोप केला. प्रतिक जाधव यांनी पत्रकारांचे आभार मानले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत