बुलढाणा : येथील गाववस्तीत शिरून एका बिबट्याने शेतकऱ्याच्या गोठ्यात धुमाकूळ घालत तब्बल चार शेळ्या, एक बोकड आणि एका मोठ्या वासराला ठार केल्याची थरारक घटना १४ जुलै रोजी रात्री घडल आहे. बिबट्याने आठ दिवसांपूर्वी 6 बकऱ्यांवर हल्ला केला होता. त्यामध्ये रमेश बाबूराव सोनुने यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले होते. सतत अशा घटना घडत आहेत.
या घटनांमुळे गिरडा गावात प्रचंड दहशतीचे वातावरण पसरले असून, वनविभागाने तात्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गिरडा गावच्या मध्यभागी राहणारे शेतकरी नरेंद्र नामदेव पंडीत यांच्या घराशेजारीच त्यांचा जनावरांचा गोठा आहे. १४ जुलैच्या रात्रीच्या सुमारास दबा धरून बसलेल्या एका बिबट्याने थेट गावात आणि या गोठ्यात प्रवेश केला. बिबट्याने गोठ्यातील प्राण्यांवर हल्ला चढवत ४ शेळ्या, १ बोकड आणि १ मोठे वासरू यांना जागीच ठार केले. सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
बिबट्याने थेट गावाच्या मध्यभागी येऊन जनावरांची शिकार केल्यामुळे ग्रामस्थ अत्यंत भयभीत झाले आहेत. आज जनावरांवर झालेला हा हल्ला उद्या लहान मुले, महिला किंवा शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांवरही होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
गावच्या बाजूला असलेल्या ‘रायमुनिया’ झाडी-झुडपांमुळे हिंस्त्र प्राण्यांना लपायला जागा मिळते. त्यामुळे वनविभागाने या भागाची तात्काळ साफसफाई करावी आणि गावाच्या बाजूने संरक्षक जाळीचे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. या संदर्भात शिवसेना विभाग प्रमुख राजेंद्र गायकवाड, सरपंच सौ. सुनिता गायकवाड, योगेश गायकवाड, अशोक गायकवाड, रविन्द्र गायकवाड, ज्ञानेश्वर पोफळे, शुभम शेळके व गिरडा येथील समस्त गावकऱ्यांनी वनविभागाकडे लेखी निवेदनाद्वारे ही मागणी केली आहे. वनविभागाने यावर तात्काळ पावले न उचलल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही गावकऱ्यांनी दिला आहे.





Total Users : 1372425