आ. संजय गायकवाड यांचा कडक ईशारा
बुलढाणा, 20 ऑगस्ट (गुड इव्हिनिंग सिटी) : शहर आणि लगतच्या ग्रामीण भागातील वाढत्या कचऱ्याच्या समस्येवर मात करण्यासाठी प्रशासनाने महत्त्वाची पावले उचलली आहेत. यासंदर्भात नुकतीच जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात आमदार संजय गायकवाड, बुलढाणा नगर पालिकेच्या नगराध्यक्षा पुजाताई गायकवाड यांच्या उपस्थितीत एक विशेष बैठक पार पडली. बुलढाणा अर्बनचे संस्थापक राधेश्याम चांडक यांनी जिल्हाधिकारी यांना बुलढाणा शहरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या कचर्याबाबत हस्तक्षेप करण्याची मागणी केली होती. त्यानंतर आमदार संजय गायकवाड यांनी सुध्दा याची तत्काळ दखल घेत आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. आमदार संजय गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, मोताळा नगरपंचायतीच्या कचरा डेपोचा विषय, शहरातील आणि ग्रामीण भागातील रस्त्यांच्या दुतर्फा टाकल्या जाणाऱ्या कचऱ्याची गंभीर दखल या बैठकीत घेण्यात आली. मोताळा येथील कचरा डेपोचा प्रश्न निकाली काढण्यासाठी तो सध्याचा स्पॉट हलवून नवीन जागेवर हलवण्याचा निर्णय घेण्यात आला असून जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने कारवाईचे निर्देश दिले आहेत. याशिवाय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्टेट हायवे, नॅशनल हायवे आणि सर्व्हिस रोडवरील अतिक्रमणे हटवण्याची कारवाई प्रशासनातर्फे केली जाणार आहे.
बुलढाणा सुंदर आणि स्वच्छ ठेवण्यासाठी नगरपालिकेकडून पुरेशा प्रमाणात घंटागाड्या उपलब्ध करून दिल्या जात आहेत. मात्र, तरीही काही शासकीय कर्मचारी, अपार्टमेंटमध्ये राहणारे नागरिक, हॉटेल व्यावसायिक, मच्छीमार व विक्रेते कचरा रस्त्यावर किंवा झाडांच्या बुंध्याशी टाकत असल्याचे निदर्शनास आले आहे. कचरा टाकणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी आणि गाड्या ट्रॅक करण्यासाठी ‘बुलेट’ कंपनीचे उच्च क्षमतेचे कॅमेरे बसवले जाणार आहेत. सुरुवातीला ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक आणि स्वच्छता दूत नागरिकांना कचरा घंटागाडीतच टाकण्याचे आवाहन करतील. वारंवार सांगूनही नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर १ हजार रुपये दंडाची कारवाई केली जाईल. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सर्व व्यापारी आणि संबंधित घटकांची लवकरच बैठक आयोजित केली जाणार असून, नागरिकांनी यात सहकार्य करावे, असे आवाहनही आमदार संजय गायकवाड यांच्या वतीने करण्यात आले आहे.





Total Users : 1369340