बुलढाणा, १० सप्टेंबर (गुड इव्हिनिंग सिटी) ः पतसंस्थेच्या संचालक मंडळाची परवानगी न घेता सोसायटीतील खात्यांमध्ये अफरातफर करुन सोसायटीचे ३४ कोटी ७७ लाख रुपयांचे आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी बुलढाणा अर्बन सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी व विभाग व्यवस्थापिकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या वर्षभरापासून पुण्याच्या बुलढाणा अर्बन पतसंस्थेत सुरु असलेली धुसफूस पोलिस स्टेशनपर्यंत पोहोचली आहे. पुण्याच्या बुलढाणा अर्बन शाखेत मोठा आर्थिक घोटाळा झाल्याची कुजबूज अनेक दिवसांपासून ऐकायला मिळत होती. शेवटी दाखल झालेल्या तक्रारीतून हे सत्य असल्याचे अधोरेखीत झाले आहे. देशपांडे यांच्याविरोधात बुलढाणा अर्बनचे लेखापरीक्षक मोहन रघुनाथ दलाल यांनी डेक्कन पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. या तक्रारीनंतर मात्र सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. शिरीष देशपांडे यांना यापूर्वीच डिसेंबर २०२५ मध्ये पतसंस्थेतून काढून टाकण्यात आले होते. देशपांडे यांनी बुलढाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक उपाख्य भाईजी यांच्या खोट्या सह्या पण केल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष दिनकर देशपांडे (वय ६८, रा. लॉ कॉलेज रोड, पुणे) आणि विभाग व्यवस्थापिका योगिनी योगेश पोकळे (वय ४४) व इतर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत लेखापरीक्षक मोहन रघुनाथ दलाल (वय ५१, रा. बुलढाणा) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार १ जानेवारी २०१८ ते १५ डिसेंबर २०२५ दरम्यान घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरीष देशपांडे हे बुलढाणा अर्बन क्रिडेट सोसायटीमध्ये पश्चिम विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते. योगिनी पोकळे या विभाग व्यवस्थापिका होत्या. त्यांनी सोसायटीमध्ये अफरातफर केल्याचे लेखापरीक्षण अहवालात समोर आल्याने दोघांना सोसायटीने डिसेंबर २०२५ मध्ये काढून टाकले होते. त्यानंतर सोसायटीच्या खात्यांचा फॉरेसिक अॅडिट केल्यानंतर आता सोसायटीच्या वतीने लेखापाल मोहन दलाल यांनी फिर्याद दिली आहे.
शिरीष देशपांडे व योगिनी पोकळे यांनी संस्थेच्या विश्वासाचा गैरफायदा घेऊन त्यांचे पदाचा गैरवापर करुन बुलढाणा को ऑप क्रेडिट सोसायटीच्या बुलढाणा बँकेचे नियमांकडे दुर्लक्ष केले. नियमबाह्य कर्ज प्रकरणे मंजूर करणे, स्वत:च्या फायद्यासाठी ० टक्के दराने कर्ज घेतले. बुलढाणा अर्बन मॅनेजमेंट सर्व्हिसेस प्रा. लि. कंपनीच्या फायद्यासाठी बिनव्याजी अॅडव्हान्स देणे, ही कंपनी बँकेची सबसिडीयरी कंपनी दाखवणे व या कंपनीकरीता संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक यांची खोटी सही करुन सदस्यत्व देणे, व नंतर रद्द करणे, खोटे बॅलन्सशिट आर ओ सीचे साईटवर अपलोड करणे असे अनेक गैरप्रकार केले.
त्याचबरोबर सोसायटीच्या संचालक मंडळाची परवानगी न घेता सोसायटीसाठी मालमत्ता खरेदी करणे, तारण न घेता कर्ज देणे, संचालक मंडळाच्या परवानगी शिवाय व्याजाची रक्कम माफ करणे, तारण मालमत्ता विक्री करुन या रक्कमा सोसायटीमध्ये न भरणे, परवानगीशिवाय मेटेनन्सचा खर्च करणे, कर्जदाराच्या संमतीशिवाय त्यांच्या खात्यात अतिरिक्त रक्कम भरुन त्या इतर बँक खात्यात बेकायदेशीरपणे वळवणे, इतर खात्यांमध्ये अफरातफर करणे, अशा प्रकारे गैरव्यवहार करुन त्यांनी संस्थेची वैधानिक लेखा परिक्षक यांच्या अहवालाप्रमाणे ३४ कोटी ७७ लाख रुपयांचे आर्थिक नुकसान केले आहे. सोसायटीच्या वतीने तक्रार अर्ज देण्यात आला होता. त्याची तपासणी झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सुहास पाटील तपास करीत आहेत.





Total Users : 1391023