spot_img

जिल्हा बँकेचा अध्यक्ष झालो पण चिंता सतावतेय ! का असे म्हणाले डॉॅ. राजेंद्र शिंगणे ??

बुलढाणा, ९ सप्टेंबर (गुड इव्हिनिंग सिटी/रणजीतसिंग राजपूत) ः अनेकांनी मनोमन जे नांव निश्चीत केलं होतं, तेच डॉ. राजेंद्र शिंगणे आज बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून अविरोध निवडून आलेत. सर्व संचालकांनी एक मताने त्यांची निवड केली. उपाध्यक्षपदी शेगांवचे गोविंद मिरगे यांची वर्णी लागली आहे. डॉ. शिंगणे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरु आहे. निवड झाल्याबरोबर त्यांनी बँक परिसरात स्थापित सहकारमहर्षी भास्कररावजी शिंगणे यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. त्यानंतर राष्ट्रमाता मॉं जिजाऊंचे दर्शन घेण्यासाठी सिंदखेडराजाकडे प्रस्थान केले. यादरम्यान गुड इव्हिनिंग सिटीने डॉ. शिंगणे यांच्याशी बँक निवडणूक संदर्भात बातचीत केली. ‘बँकेचा अध्यक्ष झालो याचा आनंद आहे परंतु समोर येणार्‍या आव्हानांचीही चिंता आहे’, या शब्दांत डॉ. शिंगणे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली.
त्यांनी म्हटले की, अनेक वर्षाने जवळपास २०१३ नंतर निवडणूक पार पडली.. खरं म्हटले तर याआधीचा काळ कठीण काळ होता, बँकेच्या, शेतकर्‍यांच्या तसेच अनेक छोट्या मोठ्या संस्थांच्या दृष्टीने कठीण काळ होता.. मला आनंदही आहे आणि समोर येणार्‍या आव्हानांची चिंता… आनंद यासाठी की, पुढची वाटचाल चांगली सुरु करायची मी अनुभवी म्हणून निवड सर्वांनी केली… अतिशय कठीण परिस्थीतीत काम करतांना २०१४ नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रातील मंत्री नितीन गडकरी यांनी सुरुवातीला २०९ कोटींचे भागभांडवल उपलब्ध करून खूप मोठी मदत केली.. नंतर कधी कर्जमाफीचे पैसे आले.. कधी वेगळ्या माध्यमातून आम्हांला निधी मिळाला.. स्व. अजीतदादा पवार यांनी ३०० कोटी रूपयांचे सॉफ्ट लोन मिळाले आणि बँकेची प्रगति खर्‍या अर्थाने सुरु झाली. त्यांची मदत मास्टरस्ट्रोक होता, या शब्दांत डॉ. शिंगणे यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

मागच्या चुकांमधून धडा घेवू
आव्हानांबाबत बोलतांना ते म्हणाले की, आता दुष्काळसदृष्य परिस्थिती जाणवतेय.. शेतीपिक किती हाती येईल याबाबत साशंकता आहे.. वसूली किती होईल याबाबत शंका आहे.. येणारा काळ दीड ते दोन वर्ष स्पर्धात्मक आहे, आव्हानात्मक आहे..  बँक हळुहळू पूर्वपदावर येत असतांना पुन्हा एखादे नवे संकट येवू नये अशी माझी प्रार्थना राहील.. निवडणूकीच्या काळात अनेक प्रचारसभांमध्ये बोललो.. सर्वांनी ठरवलं आहे.. वाटेल ते कष्ट घेवून, त्याग करून.. एनपीए कमी झाला पाहीजे..तोटा कमी झाला पाहीजे, कर्जपुरवठा करण्याची क्षमता वाढली पाहीजे.. जुनं जे झालं ते विसरून पण त्यातून धडा घेवून पुढे जावू, असा निर्धार डॉ. शिंगणे यांनी व्यक्त केला.

बँक प्रशासनाचे कौतुक
मागच्या १० वर्षात डॉ. अशोक खरात आणि त्यांच्या स्टाफने विविध सोई-सुविधा निर्माण करून ठेवल्या आहेत.. राष्ट्रीयकृत बँकेप्रमाणे व्यवहार सुरु आहेत.. सर्व इन्फ्रास्ट्रक्चर तयार आहे, या शब्दांत त्यांनी बँक प्रशासनाचे कौतुकही केले.

सहकारात मतभेद विसरण्याची ताकद !
संचालक पदासाठी विरोधकांकडून पॅनल टाकण्यात आले परंतु अध्यक्षपदाची निवडणूक अविरोध झाली, याबाबत जेव्हा गुड इव्हिनिंग सिटीने त्यांना विचारले तेव्हा जिल्हा बँकेचे निवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. शिंगणे यांनी आनंदाने म्हटले की, हीच तर सहकारातील मोठी गंमत, मोठी ताकद… आज थोडे मनभेद असतील, मतभेद असतील.. निवडणूक झाली आणि सगळं काही विसरून जाण्याची ताकद सहकारात आहे.. त्याही लोकांनी सहकार्य केले, त्याची प्रचिती आज सर्वांना आली असल्याचे डॉ. शिंगणेंनी सांगितले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत