बुलढाणा शहर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार
बुलढाणा, 9 सप्टेंबर, (गुड इव्हिनिंग सिटी): शहरातील कारंजा चौक येथील दुर्गा देवी मंदिरामध्ये आरती सुरू असताना किरकोळ वादातून मारहाण आणि तलवारीचा धाक दाखवून भाजपचे नगरसेवक आकाश दळवी यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी भाजप नगरसेवक आकाश विजय दळवी यांच्या तक्रारीवरून बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
तक्रारीत नमूद आहे की, ८ सप्टेंबर रोजी रात्री पावणेनऊच्या सुमारास आकाश दळवी हे आपल्या सहकाऱ्यासोबत मंदिरामध्ये आरती करत होते. यावेळी तेथे आलेल्या निखिल शर्मा आणि त्यांचे दोन मुले आर्यन शर्मा, वंश शर्मा, राजकीय वादातून दळवी यांच्याशी हुज्जत घालत अश्लील शिवीगाळ केली. या वादात मध्यस्थी करण्यास आलेल्या तिलक तोंडीलायता यांनाही चापटा-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली.
त्यानंतर दळवी हे जाब विचारण्यासाठी निखिल शर्मा यांच्या घरासमोर गेले असता, शर्मा यांनी घरातून लोखंडी तलवार, लोखंडी रॉड आणि बंदुकीसारखे शस्त्र आणून ‘आता बोलाव तुझे आमदार महालेला… “, असे म्हणुन मला म्हणाले की तुझे तुकडे करुन कारंजा चौकात फेकतो’ अशी धमकी देत हल्ला करण्याचा प्रयत्न केला. ‘जर आम्ही घटनास्थळावरून निघून गेलो नसतो तर आमचा जीव गेला असता’, अशा शब्दात आकाश दळवी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. या घटनेप्रकरणी पीडिताने बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे. त्यांच्याकडून जीवितास धोका असल्याचे तक्रारीत नमूद केले असून, पोलिसांनी याप्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. दरम्यान पोलिसांनी परिसरातील सदर घटनेच्या बाबतीत सिसिटीव्हीची फुटेज एकत्रित करण्यास सुरुवात केली असून त्यातून सत्य बाहेर येऊ शकेल. एका सिसिटीव्ही मध्ये तलवारसह एक तरुण दिसतोय, जो कारंजा चौकाच्या दिशेने पळतोय. पोलिसांनी शर्मा पिता पुत्राविरोधात गुन्हा दाखल केल्याचे समजते.
पोलिसांनी गुड इव्हिनिंग सिटीला सांगितले की, दुसरीकडे शर्मा यांच्या कुटुंबीयांनी आकाश दळवी आणि इतर दहा ते पंधरा जणांविरोधात तक्रार दिली आहे. दळवी यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह रात्रीच्या वेळी आमच्या घरात घुसून दहशत निर्माण केली आणि आमच्या सोबत छेडछाड केली, अशा आशयाची तक्रार दिली आहे. पोलिस सदर तक्रारीची चौकशी करीत आहेत.





Total Users : 1387670