बुलढाणा, 17 सप्टेंबर (गुड इव्हिनिंग सिटी) : लाकूड वाहतूक परवानगी मिळवून देण्यासाठी २ हजार रुपयांची लाच मागणी केल्याप्रकरणी उपवनसंरक्षक कार्यालयातील वन सर्वेक्षक अनिल जगदेव वाघ याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज १७ सप्टेंबर अटक केली आहे.
तक्रारदार हे सुतारकामाचा व्यवसाय करतात. त्यांनी दोन शेतकऱ्यांकडून सागवान झाडे विकत घेतली होती. या लाकडाच्या वाहतुकीसाठी वनविभागाच्या ट्रान्सिट पासची आवश्यकता असल्याने त्यांनी जळगाव जामोद वनविभागात अर्ज केला होता. हा अर्ज पुढील कारवाईसाठी उपवनसंरक्षक कार्यालय, बुलढाणा येथे पाठवण्यात आला होता.
पास मिळवण्यासाठी तक्रारदाराने वन सर्वेक्षक अनिल वाघ यांच्याशी संपर्क साधला असता, वाघ यांनी संगनमताने पास मिळवून देण्याच्या बदल्यात प्रति घनमीटर हिशोबाने अथवा काम करून देण्यासाठी २ हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराने याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बुलढाणा यांच्याकडे रीतसर तक्रार दाखल केली. एसीबीने ९ जुलै व १६ जुलै रोजी पंचांसमक्ष या तक्रारीची पडताळणी केली. पडताळणीदरम्यान वन सर्वेक्षक अनिल वाघ यांनी तक्रारदाराकडे स्वतःकरिता २ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. यानंतर १६ जुलै रोजी दुपारी उपवनसंरक्षक कार्यालय, बुलढाणा येथे सापळा रचण्यात आला. तक्रारदार यांच्यावर संशय आल्याने अनिल वाघ यांनी २ हजार रुपयांची लाच स्विकारली नाही. परंतु या प्रकरणी आज १७ सप्टेंबर रोजी बुलढाणा शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा करण्यात आला आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बुलढाणाचे पोलीस उपअधीक्षक भागोजी चोरमले, पोलीस निरीक्षक रमेश पवार, पोहेकों प्रविण बैरागी, अमोल झिने, दिपक जाधव, जगदीश पवार, पोकॉ. शैलेश सोनवणे, पंढरी शेळके, रजिंत व्यवहारे, रतन गिरी, प्रफुल आमले, चापोहेकॉ नितिन शेटे, चापोकों अर्शद शेख यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.





Total Users : 1396394