बुलढाणा, 19 सप्टेंबर (गुड इव्हिनिंग सिटी) : बुलढाणा जिल्हा पत्रकार संघ संचलित ’वृत्तेश्वर गणेशोत्सव मंडळा’च्या वतीने यंदाच्या गणेशोत्सवात एका भक्तिमय आणि संगीतमय कार्यक्रमाची मेजवानी बुलढाणेकरांना मिळणार आहे. येत्या सेोमवार, 21 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता पत्रकार भवन परिसरातील सैनिकी मंगल कार्यालयात ’भजन संध्या’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून भजनसाम्राज्ञी कु. राधिका जैस्वाल आपल्या मधुर स्वरांनी भक्तीची ही मैफिल गाजविणार आहेत. तमाम बुलढाणेकरांनी ही भजनसंध्या अनुभवावी, असे आवाहन बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले आहे.
कु. राधिका जैस्वाल ही आपल्या सुरेल आणि मधुर स्वरांनी भाविकांना मंत्रमुग्ध करणार आहे. राधिका हिचा संगीत क्षेत्रातील प्रवास अत्यंत रंजक आणि प्रेरणादायी आहे. इयत्ता आठवीत असताना केवळ इंग्रजी गाणी गाणाऱ्या राधिकाला बुलढाण्यातील पेठेतील श्री राम मारोती मंदिरात पहिल्यांदा भजन गायनाची संधी मिळाली होती. या पहिल्याच भजनाने श्रोत्यांची मने जिंकली आणि तिच्यातील सुप्त गायनप्रतिभेची विशेष दखल घेतली गेली. तिथून सुरू झालेला हा सुरेल प्रवास आजही अविरत सुरू असून, तिचे अनेक ठिकाणी रसिकांच्या भरगच्च उपस्थितीत कार्यक्रम झाले आहेत. वृत्तेश्वर गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दरवर्षी गणेशोत्सवाचे औचित्य साधून विविध सामाजिक, प्रबोधनात्मक आणि भक्तिमय कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. पत्रकार बांधवांसह शहरातील सर्व धर्मीय भाविकांना आणि संगीतप्रेमींना एकत्रित आणून या भक्तिरसाचा आनंद घेता यावा, यासाठी यंदा या ’भजन संध्ये’चे विशेष आयोजन करण्यात आले आहे. यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन वृत्तेश्वर गणेशोत्सव मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.





Total Users : 1398229