spot_img

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना बुलढाण्यात अटक !

बुलढाणा, 30 सप्टेंबर (गुड इव्हिनिंग सिटी/रणजीतसिंग राजपूत) : संपूर्ण देशात ठिकठिकाणी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आंदोलन होत आहे. भाजप आणि घटक पक्ष सोडून इतर सर्वच पक्ष त्यांच्या राजीनाम्याची आणि त्यांना अटक करून त्यांच्या विरोधात खटला चालविण्याची मागणी करीत आहेत. कॉक्रोच जनता पार्टीने तर 2 ऑक्टोंबर पासून दिल्लीच्या जंतरमंतरवर मोठ्या आंदोलनाची तयारी दर्शविली आहे. या घडामोडी सुरु असतांनाच सीईओ ज्ञानेश कुमार यांना बुलढाण्यात अटक करण्यात आली आहे. त्यांना बेड्या ठोकून त्यांची वरातही काढण्यात आली. हे कसं काय ! दिल्लीतील ज्ञानेश कुमार बुलढाण्यात कसे आले ? त्यांना कुणी अटक केली ? असे प्रश्न तुमच्या मनात आले असतील.. पण थांबा, बुलढाण्यात अटक झालेले ज्ञानेश कुमार खरेखुरे नाहीत.. तर प्रतिकात्मक ज्ञानेश कुमारांना अटक दाखवित काँग्रेसने लक्षवेधी आंदोलन केले. ज्ञानेश कुमारांचा मुखौटा घातलेल्या एका आंदोलकाला बेड्या ठोकीत काँग्रेसने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. ‌‘वोट चोर, गद्दी छोड‌’, अशा घोषणांनी आंदोलन गाजले. भारताचे विद्यमान मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीबाबत तसेच निवडणूक आयोगाच्या काही निर्णयांबाबत सार्वजनिक स्तरावर विविध प्रश्न, आक्षेप व चिंता व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमिवर निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेबाबत नागरिकांच्या मनात निर्माण झालेल्या प्रश्नांची गांभीर्याने दखल घेणे आवश्यकत असल्याचे बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीने आपल्या निवेदनात म्हटले आहे.
म्हणून सीईओ ज्ञानेश कुमार यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, त्यांच्या कार्यकाळाची तपासणी केली जावी, ही मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यांच्यासह डॉ. अरविंद कोलते, दत्ता काकस, तुळशीराम नाईक, जयश्रीताई खाकरे यांच्यासह अनेक नेते, कार्यकर्ते सहभागी झाले होते.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत