◾ 20 वर्षे सश्रम कारावासनिर्णय
बुलडाणा, 31 ऑक्टोबर (गुड इव्हिनिंग सिटी) : १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी आणि ती गर्भवती राहिल्याप्रकरणी देऊळघाट येथील सतिष खंडारे याला २० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. बुलडाणा येथील जिल्हा व सत्र न्यायालय-३ तथा विशेष न्यायाधीश (पोक्सो कोर्ट) रविकुमार केशरमल शर्मा यांनी आज एका महत्त्वपूर्ण निकालात आरोपीस २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट संतोष खत्री यांनी केलेला प्रभावी युक्तिवाद आरोपीला कारावासापर्यंत नेण्यासाठी महत्वपूर्ण ठरला. आरोपी सतिष शंकर खंडारे रा. देऊळघाट असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या नराधमाचे नाव आहे. देऊळघाट येथील आरोपी सतिष खंडारे याने ३ एप्रिल २०२१ रोजी रात्रीच्या सुमारास घरात कोणीही नसताना आरोपी याने पिडितेच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. तसेच, ही घटना कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतरही आरोपीने वारंवार घरी कोणी नसताना पिडितेवर अत्याचार केल्याने ती गर्भवती राहिली. काही दिवसांनी पिडितेच्या आईने विचारपूस केली असता, पिडितेने घडलेला सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला. त्यानंतर पिडितेच्या आईने बुलडाणा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये येऊन रीतसर तक्रार दाखल केली.
तक्रारीवरून बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक गजानन शिंदे यांनी यशस्वीरीत्या पूर्ण करून तपासाअंती आरोपीविरुद्ध सबळ पुरावा गोळा केला आणि विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्यादरम्यान सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील ॲड. संतोष मुलचंद खत्री यांनी प्रभावी युक्तिवाद केला. खटल्यात एकूण १० साक्षीदार तपासण्यात आले, ज्यामध्ये पिडिता आणि तिची आई यांची साक्ष अत्यंत महत्त्वाची ठरली. इतर साक्षीदारांनीही सरकारी पक्षास पूर्ण मदत केली.
सर्व साक्षी-पुराव्यांचे व युक्तिवादाचे अवलोकन करून आज ३१ ऑक्टोबर रोजी विशेष न्यायाधीश रविकुमार केशरमल शर्मा यांनी आरोपी सतिष शंकर खंडारे यास विविध कलमान्वये दोषी ठरवले. आरोपीला पोक्सो अॅक्टचे कलम ६ नुसार २० वर्षे सश्रम कारावास व २ हजार रुपये दंड, भा.दं.वि. कलम ५०६ नुसार १ वर्ष सश्रम कारावास व १ हजार रुपये दंड तसेच, पोक्सो कायद्यांतर्गत विशेष शिक्षा दिली असल्याने भा.दं.वि. च्या इतर कलमांखाली वेगळी शिक्षा न देता सर्व शिक्षा आरोपीला एकत्र भोगावयाच्या आहेत, असे न्यायालयाने स्पष्ट केले. याशिवाय, दंडाची संपूर्ण रक्कम पिडितेला नुकसानभरपाई म्हणून आरोपीने अदा करावी, असा आदेशही न्यायालयाने पारित केला आहे.
या खटल्यात सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील ॲड. संतोष मुलचंद खत्री यांनी प्रभावी युक्तिवाद केला, तर तपास अधिकारी पोउपनि गजानन शिंदे यांनी सक्षम तपास केला. खटल्याच्या कामकाजात कोर्ट पैरवी म्हणून सहाय्यक फौजदार शेखर थोरात यांनी मोलाची मदत केली.





Total Users : 1442917