बुलढाणा, 6 नोव्हेंबर (गुड इव्हिनिंग सिटी) :- महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून अॅड. जयश्रीताई शेळके यांचे नांव घोषित केल्यापासून काँग्रेसमधील काही नेत्यांनी स्वतःला बुलढाणा विधानसभेतील प्रचारापासून दूर ठेवले आहे. त्यात एक नांव काँग्रेसचे महासचिव हर्षवर्धन सपकाळ यांचेही आहे. जयश्रीताईंनी 29 नोव्हेंबरला उमेदवारी अर्ज दाखल केल्या त्यादिवशी हर्षवर्धन सपकाळ चिखलीला राहुल बोंद्रे यांच्यासोबत होते. तिकीटाच्या लढाईत जयश्रीताईंनी बाजी मारल्यापासून ते ‘नाराज’ असल्याचे त्यांचे समर्थक सांगतात त्यांची नाराजी महायुतीचे उमेदवार संजय गायकवाड यांच्या पथ्यावर पडू शकते. अशातच सपकाळ यांनी उद्या, गुरुवार, 7 नोव्हेंबर रोजी गर्दे वाचनालयाच्या सभागृहात काँग्रेसच्या बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीत नेमकी काय भूमिका घेतली जाईल, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. हर्षवर्धन सपकाळ ‘मॅनेज’ झाले, असा अपप्रचार महायुतीकडून केला जात असल्याचेही समजते. परंतू सपकाळ हे काँग्रेसचे अत्यंत निष्ठावंत आणि विश्वासू आहेत, हे वेळोवेळी दिसून आले आहे. उबाठाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता प्रबळ असतांना त्यांनी काँग्रेस पक्षाकडूनच उमेदवारीचा निर्धार केला होता म्हणून त्यांच्याविरोधात अफवा उठत असल्या तरी ते महाविकास आघाडीचे काम करतील असा विश्वास त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त केला जात आहे. उद्याच्या मेळाव्यात ते काय बोलतात याची उत्सुकता अॅड.जयश्रीताई आणि संजय गायकवाड या दोन्ही उमेदवारांना नक्कीच असेल यात शंका नाही.





Total Users : 1353520