दुसरबीड शिवारात सापडलेला मृतदेह “त्या” वकिलाचा
बुलढाणा, 9 नोव्हेंबर (गुड इव्हिनिंग सिटी) :- दुसरबीड शिवारातील पूर्णा नदीच्या पात्राजवळ सापडलेला मृतदेह एका वकिलाचा असल्याचे निष्पन्न झाले असून त्याच्या लहान भावानेच पैशाच्या वादातून हा खून केल्याचे प्रथमदर्शनी तपासात उघड झाले आहे. मागील 4
नोव्हेंबरपासून बेपत्ता असलेले वाशिमचे वकील अॅड.रघुनाथ आत्माराम गवळी (वय 36) यांचा मृतदेह काल दुसरबीडच्या नदीपात्रात एका ड्रममध्ये आढळला होता. कुजलेल्या अवस्थेत असलेला हा मृतदेह खुनााची सत्यता उलगडणारा ठरला. किनगाव राजा पोलिसांनी या संदर्भात तातडीने तपासाची चक्रे फिरवली. एपीआय नरवाडे पुढील तपासासाठी वाशिम च्या दिशेने पथक घेऊन रवाना झाले आहेत. गुड इव्हिनिंग सिटीला मिळालेल्या माहितीनुसार मृतक अॅड.रघुनाथ यांचे त्यांचा छोटा भाऊ नंदूशी वाद झाले होते. शेतातील सोयाबीन विकल्यानंतर त्या पैशांमध्ये छोट्या भावाने हेराफेरी केल्याचे मृतक अॅड.रघुनाथ यांच्या लक्षात आल्यानंतर मागील 4 नोव्हेंबर रोजी दोघांमध्ये जोरदार वाद विवाद झाल्याचे समजते. रिसोड तालुक्यातील नंधाना या गावी दोन्ही भावांचे मूळ घर असल्याचे समजते. वादा नंतर छोट्या भावाने आपल्या मोठ्या भावाचा खून करून मृतदेह ड्रम मध्ये टाकून ट्रॅक्टरमध्ये ठेवला आणि लोकांना सांगितले की, मी पुण्याला गहू घेऊन जात आहे. मृतदेह ठेवलेला हा ड्रम ट्रॅक्टरमध्ये ठेवण्यासाठी गावातील दोन जणांनी मदत ही केली होती. परंतू यात मृतदेह आहे की, गहू याबाबत अनभिज्ञ होते. सदर ट्रॅक्टर स्वतः चालवत नंदू पूर्णा नदीजवळ आला आणि त्यांने ड्रम नदीमध्ये फेकून दिला. धक्कादायक बाब म्हणजे आपला मोठा भाऊ हरवला असल्याची तक्रार त्यांने दुसर्यादिवशी पोलिसांना दिली. इकडे मच्छीमारी करतांना काही जणांना हा ड्रम मिळाला. ड्रम मध्ये काही तरी घबाड असावे अशा आशेने मच्छीमारांनी ड्रम उघडला आणि त्यांची दातखिळीच बसली. आतमध्ये कुजलेला मृतदेह होता. नंतर किनगावराजा पोलिसांनी सदर मृतदेह ताब्यात घेतला असे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. अर्थात या प्रकरणी अद्याप पोलिसांकडून कुठलीही अधिकृत माहिती माध्यमांना देण्यात आलेली नाही. बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात मृतक अॅड.रघुनाथ यांचा मृतदेह पोस्टमार्टम साठी आणला गेला आहे. सदर खून प्रकरणी अद्याप कोणालाही अटक झाले नसल्याचे पोलिसांनी गुड इव्हिनिंग सिटीला सांगितले. वाशीम येथील जिल्हा न्यायालयात मृतक अॅड.रघुनाथ आणि त्यांची पत्नी मागील 8 ते 10 वर्षांपासून प्रॅक्टिस करत होते.





Total Users : 1372393