spot_img

अक्षयतृतीयेला बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन सतर्क; नियम मोडल्यास कडक कारवाईचा इशारा

बुलढाणा १६ एप्रिल ( गुड इव्हीनींग सिटी ): अक्षयतृतीयेचा मुहूर्त अत्यंत शुभ मानला जात असला तरी या दिवशी छुप्या मार्गाने बालविवाह होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने सतर्कता वाढविली आहे. ग्रामीण व शहरी भागात १९ एप्रिल रोजी होणाऱ्या विवाह सोहळ्यांमध्ये बालविवाह होणार नाही, याची विशेष दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अमोल डिघुळे यांनी केले आहे.

भारतीय कायद्यानुसार मुलाचे किमान वय २१ वर्षे आणि मुलीचे १८ वर्षे पूर्ण असणे बंधनकारक आहे. यापेक्षा कमी वयात विवाह केल्यास तो बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ अंतर्गत बेकायदेशीर ठरतो. या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामीण भागात ग्रामसेवक तर शहरी भागात बालविकास प्रकल्प अधिकारी यांची बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. गावपातळीवर सरपंच, पोलीस पाटील आणि अंगणवाडी सेविका यांनी विवाहापूर्वी वधू-वरांचे वय तपासून खात्री करावी, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

बालविवाह लावणे हा दखलपात्र गुन्हा असून, केवळ पालकच नव्हे तर विवाह सोहळ्यात सहभागी होणारे वऱ्हाडी, भटजी, वाजंत्री, मंगल कार्यालय चालक तसेच बिछायत केंद्र चालक यांच्यावरही गुन्हे दाखल होऊ शकतात. दोषींना २ वर्षांपर्यंत सश्रम कारावास आणि ५ लाख रुपयांपर्यंत दंडाची शिक्षा होऊ शकते.

गावात किंवा परिसरात बालविवाह होत असल्याची माहिती मिळाल्यास तात्काळ चाईल्ड हेल्पलाईन १०९८ किंवा पोलीस विभागाच्या ११२ या टोल फ्री क्रमांकावर कळवावे. माहिती देणाऱ्याची ओळख गोपनीय ठेवली जाईल, असे प्रशासनाने सांगितले आहे. जिल्हा बालविवाहमुक्त करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असून, संशयास्पद विवाहांची माहिती तत्काळ देऊन नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत