spot_img

बुलढाणेकरांनो घरबसल्या करा जनगणना

मुख्याधिकारी गणेश पांडे यांचे आवाहन

बुलढाणा, 1 मे (गुड इव्हिनिंग सिटी) : बुलढाणेकरानो १६ मे पासून घरबसल्या जनगणना करण्याचे आवाहन बुलढाणा नगर पालिकेचे मुख्याधिकारी गणेश पांडे यांनी केले आहे. भारताची जनगणना २०२७ कार्यक्रम हा दिनांक १६ मे २०२६ पासून सुरू होणार आहे. यावेळी जनगणना ही डिजिटल स्वरूपात घेतली जाणार असून तिचे दोन टप्पे असणार आहेत, जनगणनेचा पहिला टप्पा हा घरांची गणना असणार आहे व तो दिनांक १६ मे २०२६ ते १४ जून २०२६ या कालावधीत पार पाडला जाणार आहे. दुसरा टप्पा म्हणजेच प्रत्यक्ष जनगणना हा टप्पा फेब्रुवारी २०२७ या महिन्यात पार पाडल्या जाणार आहे.

जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्याची म्हणजेच घर गणनेची पूर्वतयारी म्हणून नागरिकांना स्वःगणना करण्याची अर्थात सेल्फ एन्युमरेशन करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. हा स्वःगणनेचा पर्याय दिनांक १ मे २०२६ ते १५ मे २०२६ या कालावधीकरीता उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. याकरिता नागरिकांनी se.census.gov.in या पोर्टल वर भेट देऊन आपल्या घराचे जीओ लोकेशन निवडून स्वः गणना करायची आहे व त्यामध्ये विचारल्या जाणा-या ३४ सोप्या प्रश्नांची उत्तरे द्यावयाची आहेत. ह्या पूर्ण प्रक्रियेला केवळ ५ ते १० मिनिटे एवढा वेळ लागतो. विचारल्या जाणा-या प्रश्नांमध्ये आपण राहत असलेल्या घराची माहिती जसे की, फरशीचे साहित्य, भिंतीचे साहित्य, वापराजोग्या खोल्यांची संख्या, शौचालयाची उपलब्धता, घराची मालकी, कुटूंबातील सदस्य संख्या इत्यादी प्रश्नांची उत्तरे द्यावयाची आहेत. माहिती अंतिम केल्यावर आपणांस SE ID मिळणार आहे. तो आपणांस जतन करुन ठेवायचा आहे आणि आपल्या परिसरात दिनांक १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत सर्वेक्षण करणा-या प्रगणकांना त्यांच्या भेटीच्या वेळी द्यावयाचा आहे.
जनगणनेचा मुख्य उद्देश हा प्राप्त सांख्यिकी माहितीच्या आधारे विविध कल्याणकारी योजना बनविणे हा असुन आपण दिलेली माहिती ही गोपनीय ठेवली जाते. यामुळे निसंकोच आपली अचुक माहिती आपल्या प्रगणकास द्यावी.
तरी नागरिकांना आवाहन करण्यात येते की, जास्तीत जास्त प्रमाणात स्वःगणना करून जनगणना २०२७ ची कार्यवाही जलद गतीने पूर्ण करण्यासाठी प्रशासनात सहकार्य करावे. तसेच दिनांक १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत आपल्या परिसराकरीता नियुक्त घरगणना करणाऱ्या प्रगणकांना आवश्यक माहिती देऊन देखील जनगणना यशस्वी करण्याकरिता प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन बुलढाणा नगर पालिकेचे मुख्याधिकारी गणेश पांडे यांनी केले आहे.

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत