महावितरणचा विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ..?
बुलढाणा, 2 मे (गुड इव्हिनिंग सिटी) : दहावी नंतर मुलांसाठी अत्यंत निर्णायक व महत्त्वपूर्ण असलेली NEET ची परिक्षा उद्या घेतली जाणार आहे. आज सकाळपासूनच बुलढाणा जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये विजपुरवठा खंडित झाला आहे. विद्यार्थी सध्या रिव्हीजन वर लक्ष्य केंद्रित करत आहे. अशातच उष्णतेचा पारा चढला आहे प्रचंड उकाडा जाणवत असल्यामुळे घरात बसून अभ्यास करणे असह्य झाले आहे. विद्यार्थ्यांसाठी निर्णायक ठप्पा असताना महावितरणकडून विजपुरवठा खंडित झाल्यामुळे हे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळण्याचा प्रकार असल्याच्या प्रतिक्रिया पालकांनी दिल्या आहेत. अशा परिस्थितीत वीज नसल्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करणे अत्यंत कठीण झाले आहे. पंखे, कूलर आणि एसी बंद असल्याने उकाड्याचा त्रास वाढला असून मानसिक ताण आणि एकाग्रतेवरही परिणाम होत आहे.
उद्याचा दिवस हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. विद्युत पुरवठा खंडित असल्यामुळे विद्यार्थीच नाही तर लहान मुलांना सुद्धा या उकाड्याचा त्रास जाणवत आहे. सर्वच या उकाड्याने घामाघूम झाले आहे. त्यामुळे महावितरणने तात्काळ विद्युत पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी होत आहे.