spot_img

बुलढाणा जिल्हा अमरावती विभागात अव्वल

बारावीच्या निकालात मुलींची सरशी

बुलढाणा, 2 मे (गुड इव्हिनिंग सिटी) : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून जाहीर करण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या निकालात बुलढाणा जिल्ह्याने उल्लेखनीय यश संपादन करत अमरावती विभागात अव्वल स्थान पटकावले आहे. जिल्ह्याचा एकूण निकाल 95.22 टक्के लागला असून यंदाही मुलींनी मुलांपेक्षा सरशी करत आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.
जिल्ह्यातून बारावी परीक्षेसाठी एकूण 34,461 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 32,575 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुलांच्या तुलनेत मुलींचा उत्तीर्णतेचा टक्का अधिक राहिला आहे. एकूण 18,716 मुलांपैकी 17,543 मुले उत्तीर्ण झाली, तर 15,753 मुलींमधून 15,032 मुलींनी यश मिळवले.
शाखानिहाय निकाल पाहता, विज्ञान शाखेने 98.75 टक्के तर वाणिज्य शाखेने 98.99 टक्के निकालासह आघाडी घेतली आहे. कला शाखेचा निकाल 88.31 टक्के लागला आहे.
विद्यार्थ्यांचे सातत्यपूर्ण प्रयत्न, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचा पाठिंबा यामुळे हा यशस्वी निकाल साध्य झाला असल्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी अनिल अकाळ यांनी सांगितले. जिल्ह्याच्या या यशामुळे शिक्षण क्षेत्रात समाधान व्यक्त होत असून, यशस्वी विद्यार्थ्यांवर सर्व स्तरातून कौतुक होत आहे. काही शाळांचे निकाल 100% लागले आहे. विद्यार्थ्यांना चांगल्याप्रकारची गुण मिळाले असल्याने त्यांच्या परिवारात आनंदाचे वातावरण आहे. परंतु पुढच्या शैक्षणिक वर्षाला प्रवेश करण्यासाठी NEET, JEE व CET सारख्या परिक्षांना सामोरे जावे लागणार आहे. आता पुढील प्रवेशासाठी पालक वर्गाची कागदपत्रे सादर करण्यासाठी धावपळ दिसणार आहे.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत