बुलढाणा, 11 मे (गुड इव्हिनिंग सिटी/रणजीतसिंग राजपूत): लग्नाचा वाढदिवस म्हटलं की डोळ्यांसमोर येतो तो डामडौल, मेजवानी आणि हार-तुरे तर या गोष्टी सगळे करू शकतात परंतु आपल्या मृत्यूनंतर हे शरीर कुणाच्या तरी कामाला आले पाहिजे हा हेतू ठेवणारे बोटावर मोजता येतील इतकेच आहे. मरावे परी देह रूपी उरावे या उक्तीप्रमाणे बुलढाणा येथील सतीश हिम्मतराव खरे आणि लता सतीश खरे या दाम्पत्याने आपल्या लग्नाच्या रौप्य महोत्सवी २५ व्या वाढदिवसानिमित्त अवयवदानाचा संकल्प करून समाजासमोर एक आगळावेगळा आदर्श उभा केला आहे. या दाम्पत्याने आपल्या लग्नाच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ‘देहदान” करण्याचा महान संकल्प केला असून, त्यांच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
वैद्यकीय वारसा आणि समाजसेवेची ओढ
खरे कुटुंबाला समाजसेवेचा आणि विशेषतः वैद्यकीय क्षेत्राचा मोठा वारसा लाभलेला आहे. सतीश खरे यांच्या मातोश्रींनी आरोग्य विभागात २९ वर्षे, तर वडिलांनीही प्रदीर्घ काळ सेवा दिली आहे. त्यांच्या भगिनी सुनीता सुरेश मोरे यांनीही ३८ वर्षे आरोग्य सेवा केली आहे. स्वतः लता सतीश खरे या जिल्हा सामान्य रुग्णालय येथे परिचारिका म्हणून कार्यरत आहेत. कुटुंबातील या वैद्यकीय वातावरणामुळेच ‘मृत्यूनंतरही समाजाच्या उपयोगी पडावे’ ही भावना या दाम्पत्यामध्ये दृढ झाली.



