पळसखेड नाईकच्या आश्रमशाळेतून सुरू झाला यशाचा प्रवास
बुलढाणा, २१ मे (गुड इव्हिनिंग सिटी/रणजीतसिंग राजपूत) ः सध्या सोशल मीडियावर ज्या गाण्याने धुमाकूळ घातला आहे आणि अबालवृद्धांना ज्या गाण्याच्या तालावर ठेका धरायला लावला आहे, ते गाणं म्हणजे ’लाल लाल कलरची बांगडी’. या गाण्याचे गायक आणि गीतकार संजू राठोड यांचे नाव आज घराघरात पोहोचले आहे. पण अनेकांना हे माहीत नसेल की, या स्टार गायकाचे बुलढाणा जिल्ह्याशी अतिशय जिव्हाळ्याचे नाते आहे. संजू राठोड यांचे माध्यमिक शिक्षण बुलढाणा तालुक्यातील पळसखेड नाईक (नागो) येथील शाळेत झाले आहे. संजु राठोड याने इयत्ता ८ वी ते दहावीपर्यंतचे शिक्षण बुलढाण्याच्या शाळेत घेतले आहे. इथल्या मातीत तो रमला, खेळला आणि बागडलेला आहे. त्यामुळे संजुविषयी बुलढाणेकरांच्या मनात एक वेगळा जिव्हाळा निर्माण झाला आहे.
तसा संजूचा जन्म जळगांवचा.. त्याचे वडील वेल्डींग काम करायचे. जळगांवपासून १५ किलोमिटर अंतरावरील धनवड तांड्याचा तो रहिवासी… त्याने प्राथमिक शिक्षण जळगांवमध्ये केले. नंतर त्याला बुलढाण्याची वाट गवसली. संजू राठोड यांनी बुलढाणा-अजिंठा महामार्गावर असलेल्या पळसखेड नागो येथील श्री. वसंतराव नाईक शिक्षण संस्था संचलित विमुक्त जाती व भटक्या जमाती प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेत आपले शिक्षण पूर्ण केले. वर्ग ८ वी मध्ये संजू या शाळेत दाखल झाले होता. सन २०१२ मध्ये त्याने बुलढाण्यातून दहावी उत्तीर्ण करून मग पुढील भरारी घेतली. एका सामान्य ग्रामीण भागातील शाळेतून शिक्षण घेऊन आज संजूने संगीताच्या दुनियेत शिखर गाठल्याने बुलढाणा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. आनंदाची बाब म्हणजे संजूने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बुलढाण्याच्या आश्रमशाळेचा प्रेमळ उल्लेख केला. याच मुलाखतीत त्याने माध्यमीक शिक्षण पूर्ण करतांना दहावीतील एका मुलीच्या लव्ह लेटरचा किस्साही सांगितला. तिथूनच कविता-गाणे-रॅॅप सॉंग लिहीण्यास प्रारंभ झाल्याचे त्याने स्पष्ट केले आहे. अर्थात जिने लव्ह लेटर लिहीले, ती विद्यार्थिनी बुलढाण्याचीच की, जळगांवची, याबाबतची सखोल माहिती संजूकडूनच मिळू शकेल.
एकेकाळी बुलढाण्यातील पळसखेड नागोच्या मातीत खेळलेला आणि तिथल्या आश्रमशाळेत शिकलेला एक विद्यार्थी आज संपूर्ण महाराष्ट्राचा ’यूथ आयकॉन’ बनला आहे. संजूचा हा प्रवास ग्रामीण भागातील इतर विद्यार्थ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे.
ज्यांनी शिकविले त्या बुलढाण्याच्या शिक्षकांची प्रतिक्रिया पाहा..
संजूच्या गाण्यामध्ये अनेकदा इंग्रजी शब्द असतात. खूप सुंदरतेने तो मराठी गाण्यांमध्ये इंग्रजी शब्दांची गुंफण करतो. याबाबत संजूला इंग्रजी शिकविणारे आश्रमशाळेचे शिक्षक प्रमोद खोंडे यांनी गुड इव्हिनिंग सिटीला सांगितले की, संजू हा खूपच शांत, मनमिळावू होता. तो अभ्यासातही हुशार होता. विशेष म्हणजे त्याने शाळेत १०० टक्के उपस्थिती ठेवून सातत्य राखले. त्याचे हे यश?आमच्या शाळा व्यवस्थापनासाठी अभिमानस्पद आणि आमची मान उंचावणारे असल्याची प्रांजळ भावना श्री खोंडे यांनी व्यक्त केली.

’नऊवारी साडी’ आणि ’गुलाबी साडी’ या गाण्यांनी संजू राठोडला प्रसिद्धीच्या झोतात आणले. त्यानंतर ’काली बिंदी’ आणि ’एक नंबर तुझी कंबर’ या गाण्यांनी यशाचे सर्व विक्रम मोडीत काढले. आता ’लाल लाल कलरची बांगडी’ या गाण्याने तर सोशल मीडियावर रिल्सचा पाऊस पाडला आहे. या गाण्याची भुरळ केवळ सामान्य जनतेलाच नाही, तर मराठी चित्रपटसृष्टीपासून थेट बॉलिवूडपर्यंतच्या सेलिब्रिटींना पडली आहे. लहान मुलांमध्ये आकर्षण: बदलत्या ट्रेंडनुसार लहान मुलांमध्येही संजूच्या गाण्यांची मोठी क्रेझ पाहायला मिळत असून, मुले या गाण्यांमधील डान्स स्टेप्स हुबेहूब सादर करत आहेत.



