बुलढाणा : राजूरा येथे सापडलेल्या महिलेच्या मृतदेहाची ओळख पटवून देणार्याला पन्नास हजाराचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
जळगाव जामोद पोलीस स्टेशनच्या हद्दीतून एक अत्यंत थरारक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. राजूरा खुर्द शेत शिवारातील आसोफ हमीद मुल्लाानी यांच्या शेताच्या धु-बायर निंबाच्या झाडाजवळील नदीच्या काठावर एका अज्ञात स्त्री जातीचे शिरच्छेद केलेले आणि अर्धवट जळालेल्या अवस्थेतील प्रेत मिळून आले आहे. अज्ञात आरोपींनी सदर महिलेचा अत्यंत क्रूरपणे खून करून तिची ओळख पटू नये, या उद्देशाने प्रेत जाळण्याचा प्रयत्न केला असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
या धक्कादायक घटनेप्रकरणी पोलीस स्टेशन जळगाव जामोद, जि. बुलढाणा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्यापपर्यंत या मृत महिलेची ओळख पटलेली नसून, पोलीस प्रशासनाकडून सर्व जनतेला तिची ओळख पटवण्यासाठी सहकार्य करण्याचे जाहीर आवाहन करण्यात आले आहे. अनोळखी मृत महिलेचे वर्णन व अंदाजे २५ ते ३० वर्षे, साधारण ५ ते ५.३ फूट, शरीरबांधा मध्यम, रंग सावळा, केस काळे, अंगात हिरव्या रंगाचा टॉप, कथीया (काथ्या) रंगाची पॅन्ट ज्यावर काळ्या रेषा आहेत. पायातील सँडल गुलाबी रंगाचे, उजव्या हातात काळ्या रंगाचा धागा आणि डाव्या हातात हिरव्या रंगाच्या बांगड्या आहेत. गळ्यात काळ्या मण्यांची पांढऱ्या धातूची पोत (मंगळसूत्र) आहे. सदर महिलेचे शीर धडापासून वेगळे केलेले आहे. तसेच आरोपींनी पुरावा नष्ट करण्यासाठी तिचे धड व शीर ज्वलनशील पदार्थ टाकून जाळण्याचा प्रयत्न केला आहे.
पोलीस प्रशासनातर्फे जाहीर आवाहन करण्यात आले आहे की, मृत महिलेची ओळख पटवून देणाऱ्या किंवा अचूक माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल आणि त्यास पन्नास हजार रुपये रोख बक्षीस देण्यात येईल. तात्काळ संपर्क साधण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांचे क्रमांक निलेश तांबे पोलीस अधीक्षक 8527110105 श्रेणिक लोढा अपर पोलीस अधीक्षक 7058950088, अमोल गायकवाड अपर पोलीस अधीक्षक 9421016272, संतोष खाडे उपविभागीय पोलीस अधिकारी, मेहकर – तपास अधिकारी 8459957187, पो.नि. सचिन बागुल ठाणे प्रभारी अधिकारी, जळगाव जामोद 9803219803, गणेश कडू पोउपनि, उपविपोअ, कार्यालय, मेहकर 9552468970, पोलीस नियंत्रण कक्ष, बुलढाणा 07262-242400 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



