spot_img

वडनेर भोलजीत बालविवाहानंतर तीन‌ जणांवर गुन्हा दाखल

बुलढाणा, 17 (गुड इव्हिनिंग सिटी) : नांदुरा तालुक्यातील वडनेर भोलजी येथे कायद्याची पायमल्ली करत एका अल्पवयीन बालिकेचा बालविवाह लावून देण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मात्र, ‘चाईल्ड हेल्पलाईन’ आणि जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या सतर्कतेमुळे हा विवाह रोखून कायदेशीर कारवाई केली आहे. वडनेर भोलजी ता. नांदुरा, जि. बुलढाणा येथे एका अल्पवयीन बालिकेचा बालविवाह संपन्न होत असल्याची गुप्त माहिती हेल्पलाईनला मिळाली होती. या माहितीच्या आधारे तातडीने पावले उचलत प्रशासनाने हा विवाह रोखला असून, याप्रकरणी नांदुरा पोलीस स्टेशनमध्ये बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. बालविवाहाची माहिती मिळताच जिल्हा महिला व बालविकास अधिकारी आणि जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अमोल डिघुळे यांच्या मार्गदर्शनाखाली चाईल्ड हेल्पलाईन १०९८ बुलढाणाचे प्रकल्प समन्वयक शेख सोहेल, समुपदेशक विद्या खरे, पर्यवेक्षक सागर नरवाडे आणि केस वर्कर मुकेश मोरे, राहुल सुरडकर यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने हालचाली सुरू केल्या.
ग्राम पातळीवर ग्राम बाल संरक्षण समिती आणि ग्रामीण भागातील बालविवाह प्रतिबंधक अधिकारी (ग्रामसेवक) तसेच संबंधित पोलीस स्टेशनला या लग्नाबाबत कळवून विवाह रोखण्याची विनंती करण्यात आली. चाईल्ड हेल्पलाईन बुलढाणा टीमने संबंधित पोलीस स्टेशन, पोलीस हेल्पलाईन ११२ आणि बालविवाह प्रतिबंधक अधिकारी यांच्याशी समन्वय साधून थेट वडनेर भोलजी येथील बालिकेच्या घरी भेट दिली. तेथे चौकशी केली असता बालिकेचा बालविवाह संपन्न झाल्याचे निदर्शनास आले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन चाईल्ड हेल्पलाईन टीमने बालिकेला सुरक्षितपणे बाल कल्याण समिती, बुलढाणा यांच्यासमोर हजर केले. समितीचे अध्यक्ष मनोज डांगे व सदस्यांनी बालिकेची सविस्तर मुलाखत घेऊन संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली.
यानंतर बाल कल्याण समितीने बालविवाह प्रतिबंधक अधिकाऱ्यांना कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार दिनांक १६ जून रोजी संबंधित बालविवाह प्रतिबंधक अधिकाऱ्याच्या फिर्यादीवरून नांदुरा पोलीस स्टेशन येथे बालविवाह प्रतिबंध कायदा २००६ नुसार विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. बालविवाह हा कायद्याने गुन्हास असून, असे प्रकार घडत असल्यास नागरिकांनी त्वरित ‘चाईल्ड हेल्पलाईन १०९८’ किंवा पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, बुलढाणा यांच्या वतीने करण्यात आले आहे.

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत