सभासदांना ९ टक्के लाभांश जाहीर; १ कोटी १४ लाखांहून अधिक नफा
बुलढाणा, 28 सप्टेंबर (गुड इव्हिनिंग सिटी) : बुलढाणा जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेने सभासदांना नफ्यातून थेट ९ टक्के लाभांश देण्याचे जाहीर केले आहे. या पतसंस्थेला तब्बल १ कोटी १४ लाखांचा नफा झाला आहे.
बुलढाणा जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित, बुलढाणा या संस्थेची ५६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा २७ सप्टेंबर रोजी रविवारी अत्यंत उत्साहात आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, जिल्हा परिषद बुलढाणा येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष रविंद्र मापारी होते. यावेळी मानद सचिव विजय तांदुळकर, सहसचिव नरेंद्र मेतकर यांच्यासह संचालक अनिल खेडेकर, पंजाबराव बोडखे, सुनिताताई चिंते (रिंढे) आणि पुष्पाताई गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. सभेच्या सुरुवातीला संस्थाध्यक्ष रविंद्र मापारी यांनी संस्थेचा संपूर्ण लेखाजोखा आणि प्रगतीचा अहवाल सभागृहासमोर सादर केला. या अहवाल वर्षात संस्थेला १ कोटी १४ लाख रुपयांपेक्षा जास्त प्रचंड नफा झाला आहे. या नफ्यातून सभासदांच्या जमा शेअर्सवर ९ टक्के लाभांश एकूण रक्कम ९६ लाख ८६ हजार रुपये जाहीर करण्यात आला आहे.
या सभेत मंजुरीसाठी ठेवण्यात आलेल्या १ ते १३ विषयांना सर्व सभासदांनी सर्वानुमते मंजुरी दिली. सभेचे सूत्रसंचालन संस्थेचे मानद सचिव विजय तांदुळकर यांनी केले, तर उपस्थितांचे आभार संचालक पंजाबराव बोडखे यांनी मानले.





Total Users : 1402117