बुलढाणा, १ ऑक्टोबर (गुड इव्हिनिंग सिटी) : खोटे साक्षीदार, खोटे पक्षकार उभे करुन दस्त नोंदणीच्या प्रक्रीयेमध्ये होणारी फसवणूक आता हद्दपार होणार आहे. कारण, स्थावर मालमत्तेशी संबंधित खरेदी-विक्री, गहाणखत, वाटणीखत यांसह ६३ प्रकारच्या दस्त नोंदणीसाठी आधार ओळखपत्र अनिवार्य करण्यात आले आहे. महसूल विभागाच्या या निर्णयाची अंमलबजावणी १ ऑक्टोबरपासून करण्यात येणार असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. दरम्यान या निर्णयाचे दस्तलेखकांनी स्वागत केले असून बुलढाण्यातील दस्त लेखक राजू देशमुख यांनी गुड इव्हिनिंग सिटीला प्रतिक्रीया देतांना म्हटले आहे की, आधारकार्डच्या प्रमाणिकरणामुळे मालमत्ता खरेदी विक्रीमध्ये काही ठिकाणी होणार्या फसवणूक टळतील आणि प्रक्रियेमध्ये पारदर्शकता येईल.
महसूल आणि वनविभागाकडून या संदर्भात मंगळवार २९ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र शासनाचे राजपत्र घोषीत करण्यात आले आहे. यामध्ये आधारकार्डच्या प्रमाणिकरणाविषयी विस्तृत आदेश देण्यात आला आहे.
मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहारातील फसवणुकीला आळा घालण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. यासंदर्भातील राजपत्रही प्रसिद्ध करण्यात आले आहे.
नोंदणी व मुद्रांक विभागामार्फत स्थावर मालमत्तांच्या दस्तांची नोंदणी केली जाते. खोटे साक्षीदार किंवा खोटे पक्षकार उभे करून होणार्या फसवणुकीला या निर्णयामुळे आळा बसण्यास मदत होईल. तसेच नोंदणी प्रक्रियेत मानवी हस्तक्षेप कमी होऊन कामकाज अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम होण्याची अपेक्षा आहे.
ज्या व्यक्तींकडे अद्याप आधार क्रमांक उपलब्ध नाही, त्यांनी आधार नोंदणी केल्याची पावती, अन्य सरकारी ओळखपत्रे तसेच संबंधित व्यक्तीशी असलेले नाते सिद्ध करणारी आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत सादर करावी लागतील. संबंधित कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतरच व्यवहार अंतिम केला जाणार आहे.
बालकांसाठी विशेष तरतूद –
१८ वर्षांखालील बालकांच्या बाबतीत त्यांच्या माता-पिता किंवा कायदेशीर पालकांच्या संमतीने आधार नोंदणी अर्ज करता येईल. केवळ आधार क्रमांक उपलब्ध नसल्यामुळे कोणत्याही बालकाला किंवा पात्र लाभार्थ्याला दस्त नोंदणीच्या सुविधेपासून वंचित ठेवले जाणार नाही, अशी तरतूद अधिसूचनेत करण्यात आली आहे.
नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना
दस्त नोंदणीच्या अनुषंगाने आधार प्रमाणीकरण
महाराष्ट्र शासनाच्या दिनांक २९ सप्टेंबर २०२६ रोजीच्या राजपत्रातील अधिसूचनेनुसार, संबंधित लाभ/सेवा प्राप्त करण्यासाठी आधार प्रमाणीकरण किंवा आधार क्रमांक असल्याचा पुरावा सादर करण्याची तरतूद करण्यात आली आहे.
आधार क्रमांक उपलब्ध नसल्यास
१. संबंधित व्यक्तीने आधार नोंदणीसाठी अर्ज केलेला असल्यास, त्याची नोंदणी पावती (एखऊ) सादर करता येईल.
२. आधार क्रमांक प्राप्त होईपर्यंत अधिसूचनेत नमूद केलेली पर्यायी ओळखपत्रे/कागदपत्रे सादर करून ओळख निश्चित करण्याची तरतूद आहे.
३. आधार प्रमाणीकरण अयशस्वी झाल्यास, परिस्थितीनुसार पर्यायी बायोमेट्रिक किंवा जढझ प्रमाणीकरण उपलब्ध करून देण्याची तरतूद आहे. आवश्यकतेनुसार ऑफलाइन पडताळणीचीही तरतूद आहे.
नागरिकांनी लक्षात ठेवावे
आधार क्रमांक/आधार नोंदणी पावती सोबत ठेवावी.
आवश्यक असल्यास अधिसूचनेनुसार वैध पर्यायी कागदपत्रे सादर करावीत.
आधार प्रमाणीकरणासाठी आवश्यक संमती द्यावी.
बालकांच्या बाबतीत पालक/कायदेशीर पालकाची संमती व ओळख/नातेसंबंधाची पडताळणी आवश्यक आहे.
आधार प्रमाणीकरणात तांत्रिक अडचण आल्यास संबंधित कार्यालयीन अधिकार्याशी संपर्क साधावा.
ही सूचना महाराष्ट्र शासनाच्या दिनांक २९ सप्टेंबर २०२६ रोजीच्या राजपत्रातील अधिसूचनेच्या आधारे आहे.
– नोंदणी व मुद्रांक विभाग





Total Users : 1404480