spot_img

स्पष्ट विचार… थेट संदेश…‘आमचा वारसा’ विसरू नका !

– गंगा अर्बनच्या ‘त्या’ फोटो फ्रेमची सर्वत्र चर्चा

बुलढाणा, २० नोव्हेंबर (गुड इव्हिनिंग सिटी/रणजीतसिंग राजपूत) : माणूस जातीने नव्हे तर कर्माने श्रेष्ठ ठरतो, ही शिकवण सर्वच धर्मग्रंथांमध्ये आहे. परंतु धर्म सांगणार्‍यांनी नासकेपणा केला आणि शोषण व्यवस्था उभी केली. या शोषणव्यवस्थेविरोधात हजारो वर्षांपासून लढा सुरु आहे. ‘निसर्गधर्माचे पालन करा… विवेकवादी बना.. माणसाला माणूस म्हणून स्वीकारा’, हा मानवतावादी दृष्टीकोन ज्यांनी आयुष्यभर जपला, त्या महानायकांचा वारसा पुढे चालविला पाहीजे, या सद्भावनेतून येथील गंगा अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटीने ‘आमचा वारसा’ नावाची फोटो फ्रेम तयार केली आहे. यातून वैचारिक आणि मानवतावादी दृष्टीकोनाचा पुरस्कार करण्यात आला असून अनेकांना वितरीत करण्यात आलेल्या या फोटो फ्रेमची सर्वत्र चर्चा आहे.
गंगा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत माधवराव शिंदे यांनी ‘आमचा वारसा’ या एका फोटो फ्रेममध्ये दहा महापुरुषांना एकत्रीत केले आहे. मानवतेच्या लढ्याचे महानायक एकत्रीत करतांना खूप सुंदर गुंफण विणली गेली आहे. फ्रेमच्या केंद्रस्थानी भक्ती-शक्तीचा संगम म्हणजे छत्रपति शिवाजी महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज आहेत. गुलामीच्या अंधारातून स्वराज्याचा सूर्याचे दर्शन घडविणारे आपले दैवत छत्रपति शिवाजी महाराज याठिकाणी आहेत. तर भक्तीची गंगा बहुजन समाजातील घराघरात प्रवाहित करून कर्मकांडावर कडाडून प्रहार करणारे संत तुकाराम महाराज यांचा वारसा आम्हांला चालवायचा, असंच जणू ही फ्रेम सांगत आहे.  समतेची मशाल प्रदीप्त करणारे महात्मा ज्योतिबा फुले आणि आरक्षणाचे जनक छत्रपति शाहू महाराज याच फ्रेम मध्ये आहे. महात्मा फुलेंच्या बाजूला सावित्रीमाईंना स्थान देण्यात आले आहे. दगड-शेणगोळ्यांचा मारा, शिव्या-श्राप आणि पराकोटीचा अपमान सहन करूनही ज्यांनी विद्यादानाचे व्रत सोडले नाही, ती विद्येची देवता सावित्रीमाई फुले यांचा वारसा आम्ही पुढे नेत राहणार, हा संदेश यातून स्पष्ट होत आहे. ज्या संविधानाने घटनात्मक सर्वांना समान पातळीवर आणून ठेवले, त्या घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशिवाय सदर फोटो फ्रेमची कल्पनाच होवू शकत नाही. ‘दे दी हमे आजादी बिना खड्ग बिना बिना ढाल’, असा जगभरात नावलौकिक असणारे सत्य-अहिंसेचे पुरस्कर्ते महात्मा गांधीही या फ्रेममध्ये आहे. सातासमुद्रापार आपल्या साहित्याचा डंका ज्यांनी वाजविला, असे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे तसेच दिवसा आपल्या झाडूने गावातील आणि संध्याकाळी आपल्या किर्तनातून मनातील घाण साफ करणारे संत गाडगे महाराज ‘आमचा वारसा’ फ्रेममध्ये दिमाखात विराजीत आहेत. आणखी एक व्यक्ती सदर फे्रेमची शोभा वाढवित आहेत. ती म्हणजे ई.व्ही. रामास्वामी पेरीयार.. जातीव्यवस्था आणि विषमतेविरोधात दक्षिण भारतात मोठी चळवळ उभी करणारे पेरीयार स्वामी यांचा वैचारिक वारसा पुढे नेण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, असाच संदेश ही फे्रेम देत आहे.

‘फ्रेममधील दहा महामानव प्रतिकात्मक आहेत.. यांच्यासह अनेक असे चेहरे आहेत, ज्यांनी सामाजिक न्याय, समता, बंधुता आणि विवेकवाद रूजविण्यासाठी आयुष्य वेचले. त्या सर्वांप्रतिही आम्ही कृतज्ञ आहोत.. आमचा वारसा ही फोटो फ्रेम आमची वैचारिक चौकट अधोरेखीत करीत आहेत.. जाती, धर्म, प्रांतभेदाच्या पलीकडे आम्ही मानवतावाद आणि विवेकवादाचे पुरस्कर्ते आहोत, हाच शुद्ध भाव आम्हांला सांगायचा आहे, दूसरे काहीही नाही.’, या शब्दांत गंगा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत शिंदे यांनी सदर फोटो फ्रेममागील त्यांची भूमिका मांडली आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत