बुलढाणा, 10 मे (गुड इव्हिनिंग सिटी) : श्री संत गजानन महाराज संस्थान शेगावची शिस्त आणि सेवा यासाठी सर्वदूर ख्याती आहे. गजानन महाराज संस्थांकडून अनेक सुचनांचे फलक लावले आहेत. त्यांचे पालन बहुधा केले जाते पण काही याला अपवाद ठरतात. गजानन महाराज मंदिराच्या गाभाऱ्यातील श्रींच्या मूर्तीचा फोटो काढण्यास सक्त मनाई असताना सुध्दा फोटो काढले जातात. तर काही ठिकाणी थांबून फोटो काढून इतर श्री भक्तांना याचा नाहक त्रास दिला जातो. त्यामुळे श्री मंदिर परिसरातील पावित्र्य जपण्याकरिता तसेच श्री दर्शनार्थी भाविकांना श्रींचे सहज आणि सुरक्षित दर्शन व्हावे आणि गर्दीचे व्यवस्था प्रभावीपणे करता यावे, यासाठी श्रींचे मंदिर परिसरात मोबाईलचा वापर करण्यास सक्त मनाई आहे. करिता श्री मंदिरात प्रवेश करतेवेळी मुख्य प्रवेशद्वारावर कटाक्षाने आपला मोबाईल बंद करावा. श्री मंदिर परिसरात मोबाईलचा वापर करताना निदर्शनास आल्यास आपला मोबाईल जमा करण्यात येईल. मोबाईल परत घेण्याकरिता होणारा मानसिक त्रास व आपला वेळ वाचविण्यासाठी नियमांचे काटेकोर पालन करून श्री संस्थेला सहकार्य करावे असे आवाहन श्री संत गजानन महाराज संस्थांनकडून करण्यात आले आहे.



