बुलढाणा, 21 मे (गुड इव्हिनिंग सिटी) : नाफेड केंद्रावरून वखार महामंडळाच्या गोदामात पाठवण्यासाठी भरलेला तब्बल २७० क्विंटल हरभरा आणि ट्रक पळवून नेणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी ५ आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून ट्रक, रोख रक्कम आणि हरभरा असा एकूण १८ लाख ९१ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. धामणगाव बडे पोलीस स्टेशन अंतर्गत लालमाती परिसरातील नाफेड खरेदी केंद्रावरून शेतकाऱ्यांचा २७० क्विंटल हरभरा (किंमत ५ लाख ९१ हजार ७५० रुपये) वखार महामंडळ, मलकापूर येथे पाठवण्यासाठी ट्रक क्रमांक MH 43 U 5290 मध्ये भरण्यात आला होता. मात्र, आरोपींनी विश्वासघात करून हा माल ठरलेल्या ठिकाणी न ने पळवून नेला. याप्रकरणी कंत्राटदार राजेंद्र आनंदराव जंगले यांच्या तक्रारीवरून धामणगाव बडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, श्रेणीक लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या पथकाने समांतर तपास सुरू केला. पोलिसांनी ५०० किलोमीटर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे मुख्य आरोपी शेख आमीन शेख जमील (ट्रक चालक) याला मलकापूर येथून ताब्यात घेण्यात आले. त्याची कसून चौकशी केली असता, त्याने आपल्या इतर ४ साथीदारांच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली. अटक करण्यात आलेले आरोपींमध्ये शेख आमीन शेख जमील रा. पारपेठ, मलकापूर – ट्रक चालक, शेख समीर शेख सलीम रा. पारपेठ, मलकापूर शेख सादीक शेख नूरमोहम्मद रा. पांडरी पारपेठ, मलकापूर, मोहम्मद मुस्तकीन मोहम्मद मुशीर शेख रा. ईदगाह प्लॉट, मलकापूर, सोहेल खान उर्फ शोएब युनूस खान रा. पारपेठ, मलकापूर यांचा समावेश आहे. आरोपींकडून जप्त करण्यात आलेला मुद्देमालामध्ये ११८ क्विंटल हरभरा किंमत ५ लाख ९१ हजार ७५० रूपये, रोकड रक्कम ३ लाख रुपये आरोपींनी हरभरा विकून मिळालेली रक्कम, टाटा ट्रक MH 43 U 5290 किंमत 10 लाख रुपये
एकूण जप्त मुद्देमाल १८ लाख ९१ हजार ७५० आरोपींनी चोरीचा माल तेल्हारा (जि. अकोला) येथे नेऊन विकला होता, तिथून पोलिसांनी मुद्देमाल हस्तगत केला. अटक करण्यात आलेले पाचही आरोपी आणि जप्त केलेला मुद्देमाल पुढील तपासासाठी धामणगाव बडे पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला आहे. ही धडक कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अविनाश जायभाये, अंमलदार दीपक लेकुरवाळे, शेख चांद, गणेश पाटील, पुरुषोत्तम आधाय, विजय पैठणे, गजानन गोरे, विकास देशमुख आणि तांत्रिक विभागाचे राजू आडवे यांनी केली आहे.