बुलढाणा, २ जून (गुड इव्हिनिंग सिटी) ः एक जण अचानक गाडी थांबवितो आणि बाजूला असलेल्या पुलावर बसतो.. पुढच्या क्षणात तो झोपतो.. आणि निपचीत पडतो.. शेकडो लोक रस्त्यावरून येतात, जातात परंतु कुणालाही वाटत नाही की, थांबावे आणि हा माणूस का झोपला, हे पहावे ! दुर्दैव म्हणजे तो झोपला नव्हताच तर त्याचा जीव गेलेला होता.. तब्बल चार तास तप्त उन्हात शिक्षक जगदेव गजानन शिंपणे यांचा मृतदेह तसाच पडून होता. ५६ वर्षीय जगदेव शिंपणे यांचा सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. मात्र ही बाब सायंकाळी ४ वाजेदरम्यान लक्षात आली.
साखळी खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेवर कार्यरत असलेले शिक्षक जगदेव शिंपणे गौतम नगरमध्ये राहत होते. त्यांना पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलीचा विवाह झालेला आहे. गुड इव्हिनिंग सिटीला मिळालेल्या माहितीनुसार, शिक्षक जगदेव शिंपणेे हे सकाळी सुमारे १० वाजताच्या दरम्यान बुलढाणा येथून आपल्या राहत्या घरी दुचाकी (एमएच २८ बी.आर. ६८९२) वरून जात होते. दरम्यान, चिखली रोडवरील होमगार्ड ऑफिसलगत डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृहाजवळ आल्यानंतर त्यांच्या छातीत अचानक तीव्र वेदना सुरू झाल्याने त्यांनी दुचाकी रस्त्याच्या कडेला थांबविली. यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने ते गेटजवळ कोसळले असावे, असा अंदाज आहे. वसतीगृहातील वॉचमॅनच्या बर्याच वेळानंतर हे लक्षात आले की, बाहेर पूलावर कुणीतरी झोपलेले आहे. तीन तास झाले तरी सदर व्यक्ती उठत का नाही, हे पाहण्यासाठी जेव्हा दुपारी ३.३० वाजेच्या दरम्यान वॉचमॅन तिथे गेला, तेव्हा त्याच्या लक्षात आले की, समोरच्या व्यक्तीमध्ये प्राण उरलेला नाही. शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधला गेला. दरम्यान, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉ. मुशीफ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तपासले असता त्यांच्या लक्षात आले की, जगदेव शिंपने यांचा मृत्यू झालेला आहे. तोपर्यंत सदर व्यक्ती कोण, याबाबत कुणालाच कल्पना नव्हती. जेव्हा गर्दी गोळा झाली, तेव्हा मृतदेहाची ओळख पटली होती.
प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ अमोलकुमार घेवंदे करीत आहेत. शिक्षकाच्या आकस्मिक निधनामुळे साखळी खुर्द परिसरासह शैक्षणिक क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.



