बुलढाणा, 2 जुलै (गुड इव्हिनिंग सिटी) : पुढील चार दिवस कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी वर्तविला आहे. बुलढाणा जिल्ह्यासाठी 4 जुलै पर्यंत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. बुधवारी, 1 जुलै रोजी बुलढाणा शहरासह इतर ही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. हवामान तज्ञ पंजाब डख यांनी सुध्दा राज्यात 8 जुलै पर्यंत अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवली आहे. बुलढाणा जिल्ह्यात पावसाने हजेरी लावल्यानंतर शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरणीला सुरूवात केली आहे. मागील वर्षी चिखली, लोणार, मेहकर आणि देऊळगाव राजा ही तालुके ढगफुटी सदृश्य पावसाचे हॉटस्पॉट बनले होते. यावर्षी सुध्दा डोणगाव येथे ढगफुटी सदृश्य पाऊस पडला आहे. ३० जून रोजी धाड परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने नदीनाले तुडुंब भरून वाहत होते. मराठवाड्याच्या काही भागातही मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर पुढील 4 दिवस मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. आज विदर्भातील अनेक जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केले आहे. पूर्व विदर्भातील भंडारा, नागपूर, वर्धा, चंद्रपूर तर पश्चिम विदर्भातील अमरावती, बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केले आहे. त्यामुळे आज विदर्भातील बहुतांशी भागांमध्ये सर्वदूर मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल अशी शक्यता आहे. मुंबईला पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईतील काही भागात अतिवृष्टीची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे. ज्यात, 200 मिमी पर्यंत 24 तासात पावसाची नोंद होऊ शकते. दरम्यान, पुढील 72 तासांत मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात देखील चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईवर ओढवलेलं पाणीसंकट कमी होण्यास मदत होईल. नागपूर शहरात रात्री सर्वत्र दमदार पाऊस झाल्यानंतर काही तास थांबलेल्या पावसाने पहाटेपासून पुन्हा रिमझिम स्वरूपात सुरुवात केली आहे. आज नागपूर सह वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, अमरावतीसाठी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. काल रात्री अनेक दिवसांच्या खंडानंतर नागपुरात सर्वत्र दमदार पाऊस झाला.. विजांच्या कळकळाटासह झालेल्या पावसामुळे वातावरणात चांगलाच गारवा निर्माण झाला आहे… त्यामुळे यंदा तीव्र तापमानासह लांबलेल्या उन्हाळ्यानंतर पहिल्यांदाच दिलासादायक पाऊस झाल्याने बुलढाणेकरांना घामांच्या धारापासून सुटका होण्याची स्थिती निर्माण झाली आहे.




