महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन सादर
बुलढाणा 7 जुलै : अमरावती विभागातील प्रस्तावित अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयांच्या पुनर्रचनेत बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील मोताळा तालुक्याचा खामगाव अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात समावेश करण्यात आल्याच्या प्रस्तावाला बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांनी ठाम विरोध दर्शविला आहे. यासंदर्भात त्यांनी मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर करत मोताळा तालुक्याचा समावेश बुलढाणा अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातच कायम ठेवण्याची मागणी केली…!
आमदार संजय गायकवाड यांनी निवेदनात नमूद केले की, मोताळा तालुक्याची भौगोलिक परिस्थिती, नागरिकांची गैरसोय आणि प्रशासकीय सुलभता लक्षात घेता हा तालुका बुलढाण्याशीच जोडून ठेवणे अधिक योग्य आहे. मोताळा ते बुलढाणा हे अंतर अवघे २० किलोमीटर असून मोताळा ते खामगाव हे अंतर सुमारे ७० किलोमीटर आहे. त्यामुळे खामगावशी जोडल्यास सर्वसामान्य नागरिकांना शासकीय कामांसाठी मोठा प्रवास करावा लागेल. यापूर्वीही मोताळा तालुका बुलढाणा उपविभागीय कार्यालयाशीच जोडून ठेवण्याची मागणी सातत्याने करण्यात आली असल्याचे त्यांनी महसूल मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.
तसेच मलकापूर उपविभागातून मोताळा तालुका वगळून बुलढाणा उपविभागीय कार्यालय तसेच प्रस्तावित बुलढाणा अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातच कायम ठेवण्यात यावा आणि पुनर्रचनेबाबत काढण्यात आलेल्या सर्क्युलरमध्ये आवश्यक तो अंशतः बदल करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी आमदार संजय गायकवाड यांनी सादर केलेल्या निवेदनाची महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी गांभीर्याने दखल घेत संबंधित महसूल विभाग तसेच बुलढाणा जिल्हाधिकारी यांना विषयाची तातडीने पडताळणी करून जनहिताच्या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही करण्याचे सकारात्मक निर्देश दिले. तसेच पुनर्रचनेच्या सर्क्युलरमध्ये आवश्यकतेनुसार अंशतः बदल करण्याबाबतही संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या.
यावेळी आमदार संजय गायकवाड म्हणाले, “मोताळा तालुका हा माझ्या काळजाचा तुकडा आहे. मोताळा आणि बुलढाण्याचे नाते हे केवळ प्रशासकीय नाही, तर विकास, संस्कृती आणि जनभावनांशी जोडलेले आहे. त्यामुळे मोताळा तालुका बुलढाण्यापासून कधीच वेगळा होऊ देणार नाही. तालुक्यातील जनतेच्या हितासाठी मी कायम संघर्ष करत राहीन.” आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या या ठाम पाठपुराव्यामुळे मोताळा तालुक्यात नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.