spot_img

सरसकट कर्जमुक्तीसाठी तुपकरांचा शेतकऱ्यांसह विधानभवनात घुसण्याचा प्रयत्न

बुलढाणा, 9 जुलै (गुड इव्हिनिंग सिटी) : राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळला नसल्याचा आरोप करत क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी बुधवारी विधानभवनासमोर अभूतपूर्व आक्रमक आंदोलन छेडले. सरसकट कर्जमुक्ती, पीकविमा, शेतमालाला हमीभाव आणि प्रलंबित शेतकरी प्रश्नांवर तातडीने निर्णय घ्यावा, या मागण्यांसाठी तुपकर शेतकऱ्यांसह थेट विधानभवनाच्या दिशेने धडकले. विधानभवनात घुसण्याचा प्रयत्न करीत सातबाऱ्यांच्या प्रती विधानभवनात फेकल्या, तसेच सोयाबीन आणि कापूस उधळून सरकारचा निषेध करण्यात आल्याने विधानभवन परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
विधानभवन परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात असतानाही तुपकर क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांसह विधानभवनाच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत पोहोचले. काही क्षणांतच त्यांनी शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यांच्या प्रती विधानभवनाच्या दिशेने फेकल्या. त्याचबरोबर सोयाबीन आणि कापूस उधळून “शेतकऱ्यांच्या घामाची किंमत द्या”, “सरसकट संपूर्ण कर्जमुक्ती द्या”, “सरकारने दिलेला शब्द पाळा” अशा जोरदार घोषणा देत परिसर दणाणून सोडला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे सुरक्षा यंत्रणांची अक्षरशः धावपळ उडाली.
तुपकर शेतकऱ्यांसह अचानक विधानभवनाच्या मुख्य प्रवेशद्वारावर दाखल झाले. प्रवेशद्वार ओलांडून विधानभवनात घुसण्याचा प्रयत्न होताच पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप केला. त्याआधीच सातबाऱ्यांच्या प्रती विधानभवनाच्या दिशेने फेकण्यात आल्या आणि सोयाबीन-कापूस उधळून सरकारविरोधातील संताप व्यक्त करण्यात आला. काही काळ परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. यानंतर बंदोबस्तासाठी तैनात शेकडो पोलिसांनी तुपकर आणि त्यांच्या समर्थकांना वेढा घालत ताब्यात घेतले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत