spot_img

१० हजार रुपयांची लाच घेताना मेहकर दिवाणी न्यायालयातील बेलीफ रंगेहाथ एसीबीच्या जाळ्यात

बुलढाणा, 6 ऑगस्ट ( गुड इव्हिनिंग सिटी) : दिवाणी न्यायालयात चालू असलेल्या दाव्यात जप्तीचे वॉरंट न बजावण्यासाठी १० हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारताना बेलीफ जगदीश सुखदेव राऊत याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेगेहाथ पकडले. ही कारवाई गुरुवारी, ६ ऑगस्ट रोजी मेहकर बसस्थानक परिसरात करण्यात आली. जगदीश सुखदेव राऊत (वय ३१, रा. माळीपुरा, सिंदखेडराजा) हा मेहकर येथील वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयात ‘बेलीफ’ पदावर कार्यरत आहे. एका तक्रारदाराच्या (वय ५३, व्यवसाय-शेती) विरुद्ध न्यायालयात चालू असलेल्या दिवाणी दाव्यात स्थावर मालमत्ता जप्तीचे वॉरंट काढण्यात आले होते. हे वॉरंट न बजावता परत करण्यासाठी बेलीफ राऊत याने सुरुवातीला १५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (बुलढाणा) कडे तक्रार नोंदवली.

६ ऑगस्ट रोजी दुपारी तक्रारीची पडताळणी करण्यात आली. त्यादरम्यान तडजोडीअंती १०,००० रुपये लाच स्वीकारण्याचे आरोपीने मान्य केले. त्यानंतर लगेचच दुपारच्या दरम्यान मेहकर बसस्थानक परिसरात एसीबीने सापळा रचला. तक्रारदाराकडून १० हजार रुपयांची लाच स्वीकारताच आरोपी जगदीश राऊत याला रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले.
या प्रकरणी पोलीस स्टेशन मेहकर येथे आरोपीविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ च्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सदरची कारवाई भागोजी चोरमले (पोलीस उपअधिक्षक, ला.प्र.वि. बुलढाणा). सापळा अधिकारी: रमेश पवार (पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. बुलढाणा),  पोलीस अंमलदार शैलेश सोनवणे, पंढरी शेळके आणि नितीन शेटे यांच्या पथकाने केली आहे.

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत