बुलढाणा, 8 ऑगस्ट (गुड इव्हिनिंग सिटी/ रणजीतसिंग राजपूत): हो खरंच जिल्ह्यातील सगळे आमदार एकत्र मांडीला मांडी लावून बसल्याची ऐतिहासिक घटनाच घडली आहे. त्यांच्यासोबत प्रमुख पक्षातील दिग्गज नेतेमंडळीही आज गळ्यात गळे घालत आहे. यातील काही तर उठल्या बसल्या एकमेकांना शिव्या-शाप देतात.. पण सहकारासाठी मतभेद, पक्ष, संघटना सगळे जोडे बाहेर काढून जिल्ह्याचे राजकीय भाग्यविधाते जिल्हा बॅंकेच्या भाग्यासाठी सोबत आल्याचे चित्र नव्हे तर फोटो समोर आले आहेत. कारण यांना एक तत्व बऱ्यापैकी उमगले आहे की “विना सहकार, नाही उद्धार”… आता उद्धार कुणाचा?? अहो स्वतःचा नाही तर जिल्हा बँकेचा उद्धार यांना करायचा आहे.
सर्वांना माहिती आहे की नाही, माहित नाही पण सहकार क्षेत्रातील सर्वांनाच हे माहीत आहे की, बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेची निवडणूक सुरू आहे. अर्ज मागे घेण्यासाठी केवळ सोमवारचा दिवस बाकी राहिला आहे. त्या दृष्टीने नेत्यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. तब्बल सतरा वर्षांनी ही निवडणूक होत असल्याने कुठलाच खतरा या सहकार नेत्यांना उचलायचा नाही. प्रत्येकाला संचालक व्हायचे आहे. पण जागा मर्यादित असल्याने मागे पुढे होऊ शकते. पण जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे यासाठी सर्व नेते एकत्र आल्याची घटना घडली आहे. या आधी माजी मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे व केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव हे बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे आता सर्वच बिनविरोध निवडून यावे या दृष्टीने खामगाव येथील बैठकीत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. खामगाव येथे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वपक्षीय महत्त्वपूर्ण आयोजित करण्यात आली होती.
बैठकीदरम्यान जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीची तयारी, संघटनात्मक बांधणी, सहकार क्षेत्रातील समन्वय तसेच पुढील रणनीती चर्चा झाली. या बैठकीस केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, कामगार मंत्री आकाश फुंडकर, माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, आमदार मनोज कायंदे, आमदार चैनसुख संचेती, आमदार डॉ. संजय कुटे, आमदार श्वेताताई महाले, आमदार संजय गायकवाड, माजी आमदार ध्रुपतराव सावळे, माजी आमदार संजय रायमुलकर, माजी आमदार तुकाराम कायंदे, माजी आमदार राजेश एकडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार विजयराज शिंदे, उ.बा.ठा. जिल्हा संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर, जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत, जिल्हाप्रमुख बळीराम मापारी, जिल्हाप्रमुख नाझेर काझी, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, अमोल अंधारे यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, सहकार क्षेत्रातील मान्यवर, संचालक, कार्यकर्ते व मोठ्या संख्येने उपस्थित होते.






Total Users : 1357428