spot_img

रिलायन्स मॉलमधील काजूकतली की, “अळीकतली”?

बॉक्स उघडल्यावर दिसल्या अळ्या
फुड अँड ड्रग विभागाकडून कसून तपासणी

बुलढाणा, 9 ऑगस्ट (गुड इव्हिनिंग सिटी) : किराणा दुकानातून घरी आणलेले सिलबंद पॅकेट फोडल्याबरोबर त्यातून जर अळ्या बाहेर पडत असतील तर काळजात धस्स होणारच की… काजुकतलीच्या पॅकेटमध्ये अळ्याच अळ्या वळवळत असतील तर त्याला काजूकतली म्हणावे की, अळीकतली, हा प्रश्न पडतो. येथील रिलायन्स मॉलमधील काजूकतली मध्ये अळ्या निघाल्यानंतर अन्न व औषधी प्रशासनाने काजूकतलीचे सॅम्पल जप्त करीत तपासणी केली आहे. घटना काल, शनिवार 8 ऑगस्टच्या सायंकाळी 5 वाजेदारम्यानची आहे.

शहरातील रिलायन्स मॉलमधून खरेदी करण्यात आलेल्या “सीताश्री-लक्ष्मीनारायण” कंपनीच्या काजूकतलीच्या बॉक्समध्ये चक्क बुरशी आणि जिवंत अळ्या आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. गोड पदार्थाच्या नावाखाली ग्राहकांना नेमके काय विकले जात आहे, असा गंभीर प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

प्राप्त तक्रारीनुसार, संबंधित काजूकतलीचा बॉक्स उघडताच त्यातील मिठाईवर बुरशी पसरलेली आणि अळ्या वळवळताना दिसून आल्या. उत्पादनावरील बॅच/बारकोड क्रमांक 8906151422017 असल्याचे नमूद करण्यात आले आहे. हा धक्कादायक प्रकार निदर्शनास येताच अन्न व औषध प्रशासनाकडे तातडीने तक्रार करण्यात आली.

तक्रारीची गंभीर दखल घेत अन्न सुरक्षा अधिकारी जि. के. वसावे यांच्या नेतृत्वाखाली FDA बुलढाण्याच्या पथकाने तत्काळ संबंधित ठिकाणी धडक देत कारवाई केली.

दरम्यान, ही काजूकतली किती दिवसांपासून विक्रीसाठी ठेवण्यात आली होती? अशाच प्रकारचे आणखी किती बॉक्स ग्राहकांच्या घरात पोहोचले? उत्पादनाची साठवणूक आणि कालबाह्यता नियम पाळण्यात आले होते का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित झाले आहेत. प्रयोगशाळेचा अहवाल आणि FDAच्या पुढील कारवाईकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत