बुलढाणा, 22 ऑगस्ट (गुड इव्हिनिंग सिटी) ः सर्व दुकानदारांनी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून दोन बाबींवर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे, त्यातील पहिली म्हणजे दुकानात येणाऱ्या ग्राहकांना स्पष्टपणे कॅमेराबद्ध करू शकतील, असे सिसिटीव्ही लावणे आणि दूसरी बाब, जे कुणी तोंडावर रूमाल किंवा मास्क बांधून येत असतील त्यांच्यावर लक्ष ठेवणे. चैतन्यवाडीतील एका दुकानात भर दिवसा चेन स्नॅचींग झाली असून परिसरात यामुळे एकच खळबळ उडाली आहे. लहाने चौपाटीपासून चैतन्यवाडीत पारडेज क्लासेसकडे जाणाऱ्या मार्गावर सदावर्ते यांचे प्रचिती गिफ्ट अँड जनरल स्टोअर आहे. क्षितीजा सदावर्ते दुकानात असतात. आज सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास एका बाईकवर दोघे तरूण दुकानावर आले. त्यातील एक जण बाईकवर थांबला तर दूसरा दुकानात आला. तोंडावर मास्क बांधलेल्या या दुसऱ्या तरूणाने क्षितीजा सदावर्ते यांच्याकडे परफ्यूमची मागणी केली. दुकानातील कपाटातून परफ्यूची बॉटल घेण्यासाठी त्या जशा वळल्या, दूसऱ्याच क्षणाला मास्क बांधलेल्या या अज्ञात तरूणाने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र ओढले आणि तो धावत बाहेर उभ्या असलेल्या बाईकवर बसला. दोन्ही तरूण काही समजण्याच्या आतच बाईकवर धूम स्टाईलने पसार झाले. माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील रस्त्यांवर सदर बाईकचा शोध घेण्यात आला. परंतु अद्याप दोन्ही आरोपी मिळून आलेले नाहीत. गुड इव्हिनिंग सिटीला मिळालेल्या माहितीनुसार क्षितीजा सदावर्ते यांच्या गळ्यात सोन्याच्या दोन साखळ्या होत्या. आरोपीच्या हातात त्यातील मंगळसुत्र लागले. ओढतांना मंगळसुत्रातील सोन्याचे काही मणी दुकानातच पडलेले मिळून आले तर चोरांच्या हातात डोरले आणि दोन मणी लागले असल्याचे समजते. शहरातील दुकानदारांनी, विशेषतः जी दुकाने महिला चालवितात, त्यांनी दुकानदारी करतांना अंगावर सोन्याची आभूषणे परिधान करण्याचे टाळले पाहीजे. तसेच दुकानात सिसिटीव्ही असणे अत्यावश्यक झाले आहे. महत्वाची बाब म्हणजे तोंडावर मास्क बांधून, तोंड बांधून अर्थातच चेहरा झाकून येणाऱ्या ग्राहकांवर सुक्ष्म लक्ष असू द्यावे. अशा प्रत्येकालाच चोर म्हणणे चुकीचे आहे. परंतु चेन स्नॅचिंगवाले तोंड बांधूनच येतात, हे सत्य आहे.





Total Users : 1371214