महावितरणचा खड्डा; ग्रामपंचायतची अर्धवट दुरुस्ती!
बुलढाणा : शहरालगतच्या सागवान परिसरातील गोडे कॉलेजजवळील पूर्भे लेआउटमध्ये महावितरणकडून ९ ऑगस्ट रोजी विद्युत पोल उभारण्याचे काम करण्यात आले. पोल उभारण्यासाठी विविध ठिकाणी खड्डे खोदण्यात आले. मात्र, हे काम करताना ग्रामपंचायतीची पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्याने परिसरातील नागरिकांसमोर नवीन समस्या निर्माण झाली आहे. गेल्या महिन्याभरापासून पाईपलाईन जोडणीचे काम अर्धवट झालेले असून खड्डाही धोकादायक ठरत आहे.
पाईपलाईन फुटल्यानंतर नागरिकांनी महावितरणकडे वारंवार दुरुस्तीची विनंती केली. मात्र, महावितरणकडून पाईपलाईन दुरुस्तीचे काम ग्रामपंचायतीचे असल्याचे सांगत ग्रामपंचायतीकडे बोट दाखविण्यात आले. त्यानंतर ग्रामपंचायतीकडेही याबाबत वारंवार तक्रार केली.ग्रामपंचायतीने पाईपलाईन फुटलेल्या ठिकाणी बूच मारून ती बंद केली. त्यामुळे पुढील भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला. त्यानंतर पाईपलाईनची अर्धवट जोडणी करण्यात आली; मात्र ज्या ठिकाणी पाईपलाईन फुटली होती, तेथील मोठा खड्डा अद्याप बुजविण्यात आलेला नाही. पाईपलाईनचे कामही पूर्ण करण्यात आले नाही. त्यामुळे पाणीपुरवठाही विस्कळीत आहे.
खड्ड्यात साचते पाणी
मोठा खड्डा तसाच असल्याने त्यात पाणी साचत आहे. त्यामुळे या ठिकाणी अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. गेल्या महिनाभरापासून ही परिस्थिती कायम असून, महावितरण आणि ग्रामपंचायत या दोन्ही विभागांकडून त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.
पाण्याचा अपव्यय
पाईपलाईन ज्या ठिकाणी अर्धवट जोडण्यात आली आहे, त्या ठिकाणी नळाला पाणी आल्यानंतर मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर पडून वाया जात आहे. याबाबत ग्रामपंचायतीला वारंवार माहिती देऊनही मनुष्यबळ कमी असल्याचे कारण सांगून दुरुस्तीचे काम पुढे ढकलले जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
एकमेकांकडे बोट
महावितरण आणि ग्रामपंचायत या दोन्ही विभागांकडून जबाबदारी एकमेकांवर ढकलली जात असल्याने प्रत्यक्ष त्रास मात्र सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. पाणीपुरवठा विस्कळीत होण्याबरोबरच रस्त्यालगतचा खड्डा अपघाताला निमंत्रण देत आहे. त्यामुळे संबंधित विभागांनी तातडीने पाईपलाईनची पूर्ण दुरुस्ती करून खड्डा बुजवावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
महावितरण की ग्रामपंचायत; अपघातास जबाबदार कोण?
रस्त्यावर किंवा रस्त्याच्या बाजूला खोदलेले खड्डे अपघाताला कारणीभूत ठरण्याच्या घटना यापूर्वी अनेकदा घडल्या आहेत. काही ठिकाणी अशा खड्ड्यांमुळे नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. तरीही प्रशासनाकडून अशा धोकादायक खड्ड्यांकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याचे चित्र आहे. सागवानमधील पूर्भे लेआउटमधील खड्डा महावितरणने विद्युत पोलसाठी खोदला, तर पाईपलाईन फुटल्यानंतर ग्रामपंचायतीने अर्धवट दुरुस्ती करून खड्डा तसाच ठेवला. त्यामुळे उद्या या खड्ड्यामुळे एखादा अपघात झाला, तर त्याची जबाबदारी नेमकी कोणाची?
पूर्भे लेआउटमधील समस्येबाबत माहिती मिळाली होती. प्रत्यक्ष त्याठिकाणी जावून पाहणी करण्यात येईल. परिस्थिती पाहून तत्काळ समस्या सोडवण्यात येईल.
-देवेंद्र बरडे
ग्रामपंचायत अधिकारी, सागवान





Total Users : 1396209