अमरावती विद्यापीठाचा युवा महोत्सव यंदा बुलढाण्यात
राजर्षी शाहू इंजीनिअरींग कॉलेजला मिळाला आयोजनाचा बहुमान ः २०५ महाविद्यालयातील ६ हजार विद्यार्थ्यांचा सहभाग
२९ सप्टेंबर पासून २ ऑक्टोंबर २०२६ पर्यंत जल्लोषाला होणार ‘युवा संस्पर्श’
बुलढाणा,  : बुलढाणेकरांनो अमरावतील विभागातील २०५ महाविद्यालयातील ६ हजार विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी आपल्याला सज्ज व्हायचे आहे.. तब्बल १८ वर्षांनंतर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा आंतर महाविद्यालयीन युवा महोत्सव बुलढाण्यात होत असून राजर्षी शाहू इंजिनिअरींग कॉलेजला युवा महोत्सवाच्या आयोजनाचा बहुमान मिळाला आहे. ‘युवा संस्पर्श-२०२६’ या नावासह हा विद्यापीठ महोत्सव मंगळवार, २९ सप्टेंबर ते २ ऑक्टोंबर २०२६ या कालावधीत इंजिनिअरिंग कॉलेजच्या विस्तीर्ण परिसरात ऍड. किर्तीताई पर्‍हाड आणि व्यवस्थापनाच्या समन्वयातून होत आहे. विद्यापीठाच्या विकास परिषदेचे संचालक डॉ. राजीव बोरकर यांनी युवा महोत्सवांतर्गत सादर होणार्‍या विविध कलाप्रकारांची तसेच नियोजनाबाबत महत्वपूर्ण माहिती दिली.
यासंदर्भात आज, राजर्षी शाहू इंजिनिअरींग कॉलेजमध्ये यासंदर्भात पत्रकार परिषद झाली. यात ऍड. किर्तीताई पर्‍हाड, डॉ. बोरकर यांच्यासह युवा महोत्सव समितीचे अध्यक्ष डॉ. निखीलेश नलोडे, सदस्य प्रा. सुरज हेरे, डॉ. नेत्रा मानकर, राजर्षी इंजि. कॉलेजचे प्राचार्य डॉ. प्रविण राणे, प्रा. बी.व्ही. नरवाडे, प्रा. प्रमोद काटकर यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती.
माहिती देतांना डॉ. बोरकर यांनी सांगितले की, सर्व २८ कलाप्रकारांच्या परीक्षणासाठी तज्ञ ८४ परीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. रंगमंच,? मंच सजावट आणि बैठक व्यवस्था सुसज्ज असून अल्प दरात भोजनव्यवस्था आहे. प्रशस्त पार्किंग, उत्तम ध्वनि आणि विद्युत व्यवस्था तर आहेच. सोबतच नव्या युगातील तरूणाईची गरज ओळखून नाविन्यपूर्ण सेल्फी प्वाईंट परिसरात बनविण्यात आला आहे. स्पर्धा प्रकारांमध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय पुरस्कार मिळविणार्‍या विद्यार्थी कलावंत-टिमला स्मृतिचिन्ह, कप आणि सर्वसाधारण विजेतेपद ठरणार्‍या महाविद्यालयात ट्रॉफी देण्यात येईल. याशिवाय बेस्ट एनसीसी कॅडेट, आदर्श विद्यार्थी तसेच उत्कृष्ट कलावंत पुरस्कार समारोहात वितरीत केले जातील. काही प्राध्यापकांना उत्कृष्ट विद्यार्थी विकास अधिकारी पुरस्कार दिले जाणार आहेत.
परिषदेत उपस्थित इतर सदस्यांनी सांगितले की, अशा युवा महोत्सवातून आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी उत्कृष्ट विद्यार्थ्यांची निवड केली जाते. मागील वर्षी अमरावतीच्या चमूने आंतर विद्यापीठ स्पर्धेत २४ पारितोषिक प्राप्त केल्याचा उल्लेखही झाला.
या पत्रकार परिषदेमध्ये राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या वतीने आणि द्वारका फाउंडेशनच्या सचिव कीर्तीताई प-हाड यांनी हा महोत्सव केवळ एक स्पर्धा नसून, ग्रामीण आणि शहरी भागातील संस्कृतींचा मेळ आहे, ज्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये बंधुभाव, नेतृत्वगुण आणि सांस्कृतिक देवाणघेवाण वाढीस लावणे हाच मुख्य उद्देश असल्याचे प्रतिपादन केले. एवढ्या मोठ्या प्रमाणावर होणारा हा युवा महोत्सव बुलढाणा शहराच्या सांस्कृतिक वैभवात नक्कीच भर पाडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शेवटी, संपूर्ण विदर्भातील तरुण आणि मार्गदर्शक आपल्या शहरात येत असल्यामुळे, बुलढाणा शहर व परिसरातील सर्व नागरिक, क्रीडा व कलाप्रेमी आणि पालकांनी या महोत्सवाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून तरुण कलाकारांचा उत्साह वाढवावा आणि बुलढाणेकरांचे आदरातिथ्य संपूर्ण विद्यापीठाला दाखवून द्यावे, असे आग्रहाचे आवाहन सौ. कीर्तीताई प-हाड यांनी केले.