spot_img

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्याला एका वर्षाची शिक्षा 

बुलढाणा जिल्हा न्यायालयाचा निकाल
बुलढाणा, 30 सप्टेंबर (गुड इव्हिनिंग सिटी) : चिखली तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्याला बुलढाणा जिल्हा न्यायालयाने एका वर्षाची शिक्षा सुनावली आहे. अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपी साहेबराव सुपडा नाटेकर याला दोषी ठरवत अतिरिक्त सत्र न्यायाधीश-२ अशोक संतानी यांनी १ वर्षाचा सश्रम कारावास आणि २ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास १ महिन्याचा साधा कारावास भोगावा लागेल, असा आदेशही न्यायालयाने दिला आहे. दिनांक २१ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास चिखली तालुक्यातील एका गावात येथे ही घटना घडली. पीडित मुलगी बकरी पाहण्यासाठी आरोपी साहेबराव सुपडा नाटेकर घरासमोरून जात असताना, आरोपीने तिला डोळा मारून व हाताने इशारा करून बोलावले. त्यानंतर तिचा डावा हात धरून ओढत विनयभंग केला. पीडितेने स्वतःची सुटका करून घरी पळ काढला आणि घडलेला प्रकार आईला सांगितला. यापूर्वीही आरोपीने असा प्रकार करण्याचा प्रयत्न केला होता. कामावरून परत आलेल्या वडिलांनी घटनेची माहिती मिळताच चिखली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यावरून आरोपीविरुद्ध भा.न्या.सं. व पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस तपासादरम्यान सबळ पुरावे गोळा करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. खटल्यादरम्यान जिल्हा सरकारी वकील वसंत भटकर यांनी एकूण ७ साक्षीदार तपासून प्रभावी युक्तिवाद केला. पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने आरोपीला भा.न्या.सं. चे कलम ७९ आणि पोक्सो ॲक्टच्या कलम १२ नुसार दोषी ठरवून शिक्षा सुनावली. तसेच, पीडितेला नुकसानभरपाई मिळण्यासाठी हे प्रकरण विधी सेवा प्राधिकरण, बुलढाणा यांच्याकडे वर्ग करण्यात आले आहे. यामध्ये सरकारी वकील वसंत भटकर यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
 या प्रकरणात सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील तायडे, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद हुसे यांनी तपास अधिकारी म्हणून तर पोहेकॉ. नंदाराम इंगळे यांनी कोर्ट पैरवी म्हणून काम पाहिले.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत